परवा रात्री साधारण साडेनऊ वाजण्यांत असतील, मी झोपण्यासाठी अंथरुणावर पडलो होतो. मला झोपण्यासाठी कधीही तिची आराधना करण्याची मला वेळ येत नाही. निद्रादेवी कायम माझ्यावर प्रसन्न असते, मात्र पहाट झाली, की ही मग अजिबात अंथरुणात पडू देत नाही, उठावेच लागते. त्यावेळी परवा डोक्यांत कसलाकसला विचार होता. नेहमीप्रमाणे रेडीओ लागलेला होता. अलीकडे रेडिओने शास्त्रीय संगीताकडे काहीसे दुर्लक्ष केले आहे. मात्र एक काळ असा होता की रेडिओशिवाय शास्त्रीय संगीत ऐकायला कुठेही मिळत नसे. जिथे मोठे कार्यक्रम होत, तिथे सर्वसामान्य, खेड्यापाड्यातील रसिक जरी असले तरी पैशाच्या अभावी जाऊ शकत नसत. मला त्यावेळी रेडिओवर कलाकाराचे काहीसे दक्षिण भारतीय छापाचे नाव ऐकलेसे वाटले, लक्षांत नाही आता आणि मग त्यांचे गायन सुरु झाले ! ते गात होते, तो होता – राग मारवा ! मला खूप आवडतो, केंव्हाही लागला तरी आवडतो.

आमच्या घरी माझ्या लहानपणापासून कानावर गाणे पडत आले आहे, आईची कृपा. ती शिकवायची, शाळेतली मुलं-मुली यायच्या आमच्याकडे शिकायला, काही वेळा गृहिणी असलेल्या, हौशी बायका पण यायच्या. मात्र कोणीही जास्त टिकायच्या नाहीत, अगदी वर्षंदोन वर्षे, फार तर म्हणजे दोनतीन अथवा फारच डोक्यावरून पाणी गेले तर चार वर्षे ! ‘किती दिवसांत संपूर्ण गाणे येईल’ हा प्रश्न, त्या काळांत पण माझ्या आईला विचारला जात. आईचे उत्तर ठरलेले असे – तुम्ही या तर खरे, मग बघा, किती दिवसांत तुम्हाला येते ते. गांधर्व विद्यालयाच्या गाण्याच्या आणि वादनाच्या परीक्षा त्यावेळी व्हायच्या. आमच्या गावाला परीक्षा केंद्र नव्हते, मग आईला तिचे विद्यार्थी, तिचे गुरु कै. गोविंदराव कुलकर्णी यांच्याकडे जळगांवला परीक्षेला बसवावी लागत.

विद्यार्थी शिकायला आला की त्याचे सुरुवातीचे राग ठरलेले. सुरुवातीला भूप, दुर्गा, देश, खमाज, काफी, भीमपलास, सारंग हे राग असायचे तर पुढील वर्षाला यमन, भैरव, भैरवी, आसावरी, जौनपुरी, बिहाग, हमीर हे राग असायचे. विध्यार्थी टिकलाच पुढच्या वर्षी शिकायला तर मग ऐकायला मिळायचे – जयजयवंती, केदार, शंकरा, अलैहया बिलावल, छायानट आणि बहुतेक मध्यमा पूर्ण याला असायचे ते मारवा, पूरिया, सोहोनी आणि त्यापुढील वर्षाला तोडी, दरबारी वगैरे राग ! पहिल्या दोन वर्षांपर्यंत बहुतेक विध्यार्थी असायचेच त्यामुळे, माझे हे पहिल्या दोन वर्षातील राग – भूप, दुर्गा, खमाज, सारंग, देश वगैरे राग, त्या परीक्षेच्या अपेक्षेप्रमाणे जवळजवळ पाठ झाले होते. माझी अडचण ‘गळ्याची’ होती, असे मला वाटायचे. माझी भूमिका ‘घसा कोण ताणेल?’ ही असायची. आईला कदाचित वाईट पण वाटत असेल, पण त्या निरागस वयांत कोणाला काय वाटेल हे कुठे समजत असतं ? पण एक चांगले होतं, तिच्या दृष्टीने की तालाची आवड होती, तो पक्का होता हे तिला जाणवायचे – मी विध्यार्थ्यांना धृपदाची दुप्पट, चौपट, तिप्पट तुलनेने सहज करून दाखवत असे त्यावरून ! तिच्या विद्यार्थ्यांची एक बॅच खरंच चांगली निघाली, जवळजवळ चारपाच वर्षे होती. त्यावेळी तिला शिकवतांना हा राग प्रथम ऐकला, खूप मला वेगळा वाटला, अगदी आवडला ! मारवा !

मारवा राग, याची तांत्रिक माहीती आपल्यासाठी – नी रे ग मा ध नी रे सा – रे नी ध मा ग रे नी ध सा – हे आरोह अवरोहा तर ‘ध मा ग रे, ग मा ग, रे सा’ ही पकड ! तुम्ही राग जर उभा करायचा असेल डोळ्यासमोर, तर फक्त पकड म्हणा ! कदाचित रागाला पक्के पकडून ठेवणारी हे स्वर असल्याने या स्वरांच्या समूहाला ‘पकड’ म्हणत असावेत ! यांत तीव्र मध्यम असल्याने ‘मा’ लिहीण्याची पद्धत आहे. वादी कोमल रिषभ तर संवादी शुद्ध धैवत ! आपल्याच नावाने असलेल्या ‘मारवा’ थाटातील हा राग ! यांतील गांधार काही वेळा जास्त वेगळ्या पद्धतीने वापरला तर पूरियाचा भास होतो. यातील षड्ज हा तान घेतांना जास्त उपयोगांत आणत नाही, तानेच्या शेवटास घेतात केव्हाकेव्हा. ‘रे ग मा ध, ध मा ग रे’ मुक्त अंगाने गात हा मुक्त अंगाचा जरी हा राग मानत असला, तरी याचा विस्तार फारसा करता येत नाही हा समज, तयारीच्या गायकांना, वादकांना अर्थांत काही कठीण नसते.

पूरिया आणि सोहोनी या रागांत देखील हेच स्वर, मात्र पूरियातील ‘नी’ आणि विशेषकरून ‘ग’ वेगळा योजतात. स्वर तेच पण वेगळ्या पद्धतीने उपयोग केला तर संपूर्ण चित्रच बदलून जाते, रागाचे ! मारव्याचा कोमल रिषभ हा भैरवीच्या कोमल रिषभापेक्षा किंचित चढा लावला जातो. कोमल रिषभावरचे थांबणे आणि धैवताला स्पर्श करून लगेच पुढचा स्वर घेणे, मारव्याचे वैशिष्ट्य ! पंचम वर्ज्य आणि षडजाचा मर्यादित वापर, जे दोन स्वर न हलणारे आहेत, म्हणजे ज्यांचे कोमल किंवा तीव्र स्वर होत नाहीत, त्यातील एक स्वर वर्ज्य आणि दुसरा स्वर घ्यावाच लागतो म्हणून घेतलेला, पण मग त्याचा कमीच वापर केलेला ! ही भावनाच सांगते, या जगांत आता काहीही पक्के राहीलेले नाही, जे कायम आहे म्हणून मी मानले, ते सोडून दिले आहे. आता जे आहे, ते तात्पुरते, न टिकणारे, आपल्या स्थानापासून ढळणारे ! काय पण भारतीय संगीत आहे आणि परमेश्वराने या संगीतातील कोणते सूर आणि स्वर, आमच्या या सरस्वतीच्या पुत्रांना स्वर आराधना करतांना दाखविले आहेत ? आपल्या ज्ञानाच्या, कल्पनेच्या पलीकडील गोष्टी असल्या, आपल्या ज्ञात शास्त्रास समजल्या नाहीत की मग हे परमेश्वराचे देणे आहे, हेच मान्य करावे लागते.

सूर्यास्ताला, संध्याकाळी, सूर्य मावळतीला निघतो, आपल्या घरी निघतो, आसमंतात अंधार येणार ही जाणीव येते आणि हीच या राग गाण्याची वेळ आहे. का कोणास ठेवून पण हा राग ऐकला, की वाटते, त्या रागात कोणतेही शब्द असले काय आणि नसले काय, काही फरक पडत नाही, की आपले काहीतरी महत्वाचे, हृदयाजवळचे कायमचे हरवले आहे, आता ते मिळण्याची कधीही शक्यता नाही. ही वेदना, हे दुःख आणि हे वैफल्य कोणास सांगणार ? कसे सांगणार ? कोणत्या शब्दांत सांगणार ? कोणत्या भाषेत सांगणार ? त्यांना माझी भाषा, माझे शब्द समजतील काय ? त्याची प्रतिक्रिया काय असेल ? त्याला काय वाटेल, त्यांचा काही गैरसमज तर होणार नाही ? मग यासाठी त्याला कोणत्या स्वरांत सांगावे, त्याला योग्य तेच आणि नेमके कसे सांगणार ? —- तुम्हाला सांगतो, ही भावना सांगायला काही वेगळे शब्द नको, भरपूर मोठी कविता किंवा भाषण नको ! त्यासाठी तुम्हाला काही वेगळा स्वर लावावा लागत नाही, लागणार नाही. तुम्ही ‘मारवा’ गा, काहीही बोलू नका. तुमची भावना समोरच्याजवळ बरोबर पोहोचेल. त्याच्या डोळ्यांतील अश्रू तुम्हांला त्याला सर्वकाही समजल्याने बरोबर सांगतील. मारव्याचे, त्याच्या स्वरांचे सामर्थ्य आहे ते. आपल्या शास्त्रीय संगीताचे सामर्थ्य आहे हे !

लेखक- माधव भोकरीकर

[ मराठी भावगीत विश्वात,  मावळत्या दिनकरा ( लता- ह्रदयनाथ मंगेशकर) , स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला ( अरुण दाते- ह्रदयनाथ मंगेशकर) , शब्द शब्द जपून ठेव ( सुमन कल्याणपूर- विश्वनाथ मोरे), अशी मारवा रागावर आधारलेली अत्यंत उत्कृष्ट गीते, ऐकता येतील.  ]

Leave a Reply

This Post Has 8 Comments

 1. लेख अतिशय आवडला. रागाची वैशिष्ट्ये छान खुलंवून सांगितलंय. वर्णन समर्पक. कोणीही गात नसले तरी रागाचे sur कानी पडल्याचा भास होतो. फ़ारच छान.

 2. खूपच सुंदर

 3. सुंदर

 4. काही गाजलेल्या बंदिशी सांग ना या रागातल्या आणि कोणत्या गायकांनी तय गजवल्या ही माहिती महत्वपूर्ण असेल

 5. सहज, सुंदर लेख. सकाळ सुंदर झाली. लेख वाचून झाल्यावर मारवा रागावरची गाणी लावली आहेत.

 6. शास्त्रीय संगीताचा ओ की ठो न कळणा-यालाही हे विश्लेषण आवडेल ( मलाही आवडले ) .

 7. मला शास्त्रिय संगीताचे ज्ञान अजिबात नाही. पण संगीताची आवड आहे.
  ह्या अभ्यासपूर्ण लेखामुळे मारव्याचे मर्म कळले
  धन्यवाद
  असा एकएक राग घ्यावा

 8. फारच सुंदर ! मारवा रागातील सर्वच गाणी लोकप्रिय आहेत. लेख आवडला.