लेखक: डॉ यश वेलणकर

मोहनराव स्वतःला आध्यात्मिक म्हणवून घ्यायचे. रोज ठराविक वेळ पूजा, नामस्मरण नेमाने करायचे..ठेविले अनंते तैसेची राहावे हा अभंग सतत तोंडाने म्हणत तसेच वागायचे..त्यांनी संसारात कधी लक्षच दिले नाही अशी त्यांच्या बायकोची रास्त तक्रार आहे. त्यांनी  कोणतीच जबाबदारी घेतली नाही. एक नोकरी आयुष्यभर केली पण त्या नोकरीत कोणतीही प्रमोशन स्वीकारली नाहीत. जग पैशांच्या मागे धावते आहे असे म्हणत आयुष्यभर एकाच खोलीत राहिले. कुणाच्या अध्यात न मध्यात तो आध्यात्मिक असा अर्थ लावून कुणाशी घनिष्ठ मैत्री केली नाही, दुसऱ्या माणसाला त्रास दिला नाही पण दुसऱ्याचे दुखः कमी करण्याचे प्रयत्न ही कधी केले नाहीत, कुणाला आधार दिला नाही, अडचणीत मदत केली नाही. संदीप खरे यांच्या शब्दात सांगायचे तर ते कधी  आंबा झाले नाहीत कांदा ही झाले नाहीत. पण मुलगा, मुलगी मोठे झाल्यानंतर ती मुले भरकटली त्यावेळी काही निर्णय घेणे आवश्यक होते. पण मोहन ते करू शकले नाहीत, ते ढेपाळले, कोलमडून गेले. एकटेच कुढत बसू लागले, त्यांना वेगवेगळे भास होऊ लागले. अचानक ते किंचाळू लागले. असे का होते?

याचे कारण माणूस चुकीचे तत्वज्ञान अंगीकारतो. आयुष्यातील वेगवेगळ्या भूमिका समजून घेत नाही..या भूमिका तीन प्रकारच्या असतात  – कर्ता, भोक्ता आणि साक्षी. यातील कर्ता आणि भोक्ता हे दोन रोल सर्वांच्या माहितीचे आहेत. अध्यात्म म्हणजे साक्षीभाव वाढवायचा आणि त्यामुळेच संसारात लक्ष घालायचे नाही, असे मोहनसारख्या माणसांना वाटते. सजगतेच्या, माईंडफुलनेसच्या सरावाने देखील आपण शरीराप्रती आणि मनाप्रती साक्षीभाव विकसित करत असतो. पण माईंडफुल राहायचे म्हणजे सतत साक्षी राहायचे असे नाही. काहीवेळ आपण कर्ता आणि भोक्ता होणेदेखील आवश्यक असते. ही भूमिका आपण प्रसंगानुसार निवडू शकतो. स्वतःचा असा रोल बदलवता येणे वैचारिक लवचिकता आणि सजगता असेल तरच शक्य होते. आयुष्यात हे तीनही रोल महत्वाचे आहेत. सजगतेने, अटेन्शन ट्रेनिंगने आपण हे तीनही रोल अधिक चांगले वटवू शकतो. आपण कृती करीत असतो त्यावेळी कर्ता असतो, गाडी चालवणारा ड्रायव्हर कर्ता असतो, गाडीत मागे बसलेले असताना प्रवासाचे सुख अनुभवतो त्यावेळी आपण भोक्ता असतो. आणि घराच्या गच्चीतून रस्त्यावरचा ट्रॅफिक तटस्थपणे पाहत असतो त्यावेळी साक्षी असतो.

कर्ता होणे म्हणजे गाडीचा चालक होणे होय. चालक होणे म्हणजे दिशा निवडणे, कोणता रस्ता स्वीकारायचा आहे ते ठरवणे. शिक्षण घेताना दहावी, बारावीत हा रस्ता निवडायचा असतो. त्यानंतर आयुष्यात अनेक वेळा निर्णय घेण्याची वेळ येते. नोकरी करायची की व्यवसाय, लग्न कधी करायचे, कुणाशी करायचे, घर कुठे घ्यायचे, मोबाईल फोन कोणता विकत घ्यायचा, फिरायला कोठे जायचे, कसे जायचे असे असंख्य निर्णय रोजच्या आयुष्यात घ्यावे लागतात. प्रमोशन घेऊन नवीन जबाबदारी घ्यायची हाही एक निर्णय असतो. जबाबदारी म्हणजे निर्णय घेण्याची क्षमता, ही क्षमता विकसित करणे म्हणजे कर्ता होणे असते. निर्णय घेतो त्यावेळी त्या निर्णयाच्या परिणामांची जबाबदारी स्वीकारावी लागते. निर्णय घेताना मानसिक तणाव येतो. तो टाळण्यासाठी काहीजणांना अशी सवय असते की निर्णय घेताना ते फारसा विचार करीत नाहीत, जो पहिला रस्ता दिसेल तोच निवडतात. पण याचा अर्थ त्यांनी कोठे जायचे आहे ते ठरवलेलेच नसते. असे केल्याने पश्चात्तापाची वेळ येते. मला जायचे होते एका ठिकाणी आणि पोचलो दुसरीकडेच असे वाटते. हे टाळायचे असेल तर समोर दिसणारे रस्ते कोठे जातात याची चौकशी करायला हवी. आवश्यक ती माहिती मिळवायला हवी. माईंडफुलनेसच्या अभ्यासाने निर्णयक्षमता विकसित होते. त्यामुळे कर्तेपणाची भूमिका अधिक चांगली करता येते.

आज मानसिक तणाव वाढले आहेत कारण सतत निर्णय घ्यावे लागतात.अनेक पर्याय उपलब्ध आहेत, त्यातून एकाची निवड करायची असते त्यावेळी मनावर तणाव येतो. दहावी, बारावी नंतर शिक्षणाच्या असंख्य शाखा आहेत, त्यातील कोणती शाखा निवडायची हा प्रश्न येतो त्यावेळी गोंधळ उडतो, तणाव येतो. पण विविध पर्याय उपलब्ध असणे हे चांगलेच आहे, नाही का ? अनेक पर्यायातील एकाची निवड करताना तणाव येतो कारण आपला निर्णय चुकला तर काय अशी भीती असते. आणि आपण सतत अचूकच असले पाहिजे हा आग्रह तणाव वाढवतो.कारण निर्णय चुकला तर दुखः भोगावे लागेल अशी चिंता वाटत असते. पण चूक होईल म्हणून कोणताच निर्णय घेता न येणे ही सर्वात मोठी चूक आहे. ती टाळण्यासाठी निर्णय घेण्याचा सराव करायला हवा. पालकांनी मुलांना तशी संधी द्यायला हवी. हॉटेलमधील मेनुकार्डवरील असंख्य पदार्थातून आपण एका डिशची निवड करत असतो त्यावेळी निर्णयच घेत असतो. त्यावेळी आपण कर्ता असतो. एका पदार्थाची निवड करून तो समोर आला आणि आपण तो खाऊ लागतो त्यावेळी आपण भोक्ता होतो.

माईंडफुलनेसच्या सरावाने आपण अधिकाधिक बीइंग इन दी झोन राहू लागतो. असे राहू लागल्याने कर्त्याचे कौशल्य वाढते. कोणत्याही कामासाठी लागणारा वेळ कमी होतो. बीइंग इन दी झोन राहणे म्हणजे मन विचलित होण्याचे प्रमाण कमी होणे. वाचताना फक्त वाचायचे, ऐकताना ऐकायचे, बोलताना बोलायचे. आपण वाचत असताना काहीतरी ऐकत असतो, दुसऱ्याचे बोलणे ऐकत असताना बोलायचे काय याचा विचार करीत असतो आणि बोलताना मोबाईलवर पाहत असतो. आपले अटेन्शन, आपले ध्यान सतत विखुरलेले असते. असे ध्यान विखुरलेले असते त्यावेळी मेंदूला अधिक ऊर्जा खर्च करावी लागते. त्यामुळे लवकर थकवा येतो, काम पूर्ण व्हायला वेळ लागतो. अधिक चांगला कर्ता व्हायचे म्हणजे बसच्या ड्रायव्हरसारखे व्हायचे. तो बसमध्ये बसतो, त्यावेळी कोठे जायचे तो बोर्ड लावतो, त्याचा मार्ग निश्चित असतो. आता त्या बसमध्ये प्रवासी आला आणि तो दुसऱ्या ठिकाणी गाडी ने असे सांगू लागला तर ड्रायव्हर त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. ड्रायव्हर सर्व प्रवाशांचे ऐकून त्यानुसार बस नेऊ लागला तर त्याच्या ठरवलेल्या ठिकाणी पोचायला त्याला खूप वेळ लागेल. कोणतेही काम करताना बऱ्याचदा आपले असेच होत असते. आपण मनात येणाऱ्या प्रत्येक विचाराला महत्व देतो त्यामुळे हातात घेतलेल्या कामाला वेळ लागतो.

माईंडफुल कर्ता व्हायचे म्हणजे मनातील अनेक विचारातून एका विचाराला निवडायचे आणि त्याला ड्रायव्हर बनवायचे. त्यानुसार कृती करायची. त्यावेळी दुसरे विचार येतील त्यांना महत्व द्यायचे नाही. दुसऱ्याचे बोलणे ऐकत असताना मोबाईलकडे पाहूया असा विचार मनात आला तरी त्या नुसार पाहायचे नाही, त्या विचाराकडे दुर्लक्ष करायचे आणि आपले लक्ष ऐकण्यावरच ठेवायचे. जेवताना फक्त जेवायचे, आंघोळ करताना आनंदाने आंघोळ करायची आणि विचार करताना सर्व ऊर्जा विचार करण्यावरच केंद्रित करायची. माईंडफुलनेसच्या सरावाने ही क्षमता वाढत जाते, सजगतेच्या सरावाने आपल्यातील कर्ता अधिक सक्षम होऊ लागतो. असा सक्षम कर्ता कोणत्याही परिस्थितीला तोंड द्यायला तयार असतो. त्या तणावाने तो ढेपाळत नाही, त्याचा मानसिक तोल ढळत नाही.

मोहनची झाली तशी आपली परिस्थिती होऊ द्यायची नसेल तर आयुष्यातील कर्ता, भोक्ता आणि साक्षी या तीनही भूमिका नीट समजून घ्यायला हव्यात. कर्ता होऊन जबाबदारी घ्यायला हवी, भोक्ता होऊन सुखाचा उपभोग अनुभवायला हवा. परिस्थिती सुखद नसेल त्यावेळी कर्ता-भावाने ती बदलण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न करायलाच  हवेत. आणि ज्या गोष्टी आपल्या प्रभावाबाहेर आहेत, बदलणे शक्य नाही, त्यांचा साक्षीभावाने स्वीकार करायला शिकायला हवे. स्वीकार आणि सहन करणे यामध्ये फरक आहे. सहन करण्यात दुखः असते, हतबलपण असते. स्वीकार आनंद देणारा असतो. ‘ इथे ओशाळला मृत्यू ‘ या नाटकातील वसंतराव कानिटकरांच्या शब्दात सांगायचे झाले तर ” राजन्, दुश्मन तुला जिवंत जाळण्यासाठी चिता रचत असताना तू म्हणतो आहेस ,थंडीत जळण्याचा मझा काही और आहे. ” हा संभाजी राजांचा भाव साक्षित्वाचा आहे, त्यांनी कर्ता होऊन शौर्य गाजवले, ते रसिक भोक्ताही झाले. आणि औरंगजेबाने त्वचा सोलून काढली त्यावेळी स्वतःच्या शरीराकडे ते साक्षीभावाने पाहू शकले. औरंगजेब त्यांना दुखी करू शकला नाही.

आपण देखील आपल्या आयुष्यात कर्ता, भोक्ता आणि साक्षी या तीन ही भूमिका सजगतेने निवडू शकतो. त्यानुसार निर्णय घेण्याची सवय स्वतःला लावू शकतो.

www.sipemindful.com
Learn and practice mindfulness by installing this android app
https://play.google.com/store/ apps/details?id=beelogical. apps.sipeedu

पुनश्चवर आत्ता हा नि:शुल्क लेख आपण वाचलात. कसा वाटला? आवडला का?

ही तर केवळ एक झलक आहे. याहूनही एकापेक्षा एक सरस, आणि विविध विषयांना वाहिलेले लेख आपण पुनश्चवर प्रसिद्ध करतो आणि करतच रहाणार आहोत. तुम्ही सशुल्क सभासद झालात तर हे सर्व लेखही तुम्हाला सहज वाचता येतील. तेही किती स्वस्त! केवळ एक रुपयात एक दर्जेदार लेख!

एक वर्षभराचे फक्त १०० रुपये भरा आणि वाचा १०४ सशुल्क लेख.

मग वाट कशाची पहाताय? ह्या लिंकवर क्लिक करा आणि लगेच सभासद व्हा

Leave a Reply

This Post Has 5 Comments

  1. मस्त आहे;मला माईंड फुलन्स चा workshop कुठे असतो (मुंबई मध्ये) या बद्दलची माहिती कुठे मिळेल?

  2. आजच्या मल्टीटास्कींगच्या युगात एकाच वेळी एकाच कामावर लक्ष केन्द्रीत करुन ती टास्क पुर्ण करण्यात बहुतेकांना अशक्य वाटते, कारण तसे केले तर इतर टास्कस् भरकटुन जाऊ शकतात ह्याची भीती. परंतु मल्टीटास्कींग करताना हातातल्या टास्कला तितक्याच शक्तीने पुर्ण करण्यासाठी लक्ष केन्द्रीत होणेही गरजेचे आहे. डोक्यात अनेक टास्कस् परंतु जी अगोदर सोडवायला घेतलीय तिला पुर्णत्व देण्यासाठी फक्त तिच्यावरच कॉन्सनट्रेट करणे गरजेचे असतेच. संतुलीत आणि शांत असलेले मनच अशावेळी कामास येते..!!!

  3. अप्रतिम आणि उदबोधक

  4. नेहमी प्रमाणेच सुंदर लेख.

  5. सुंदर लेख!!! एका वेळी एकच काम करण्याची सवय लावून घेणे किती महत्त्वाचे आहे हे लक्षात आले