मराठी साहित्याच्या क्षेत्रात आता कोणी कोणाची फिरकी घेत नाही. मराठी साहित्याच्या क्षेत्रात आता कोणी कोणावर टीका करत नाही. एकही मराठी साहित्यिक दुसऱ्या साहित्यिकाच्या प्रतिभेविषयी शंका घेत नाही. एकही मराठी साहित्यिक मीच कसा थोर आणि तो कसा चोर असं म्हणत नाही. रात्रीच्या बसण्याच्या मैफलीत एखाद्या साहित्यिकाने दुसऱ्या साहित्यिकाला, किमानपक्षी एखाद्या संपादकाला तरी हातातला मद्याचा ग्लास गेल्या कित्येक वर्षात फेकून मारलेला नाही. (याचा अर्थ कोणे एके काळी फेकून मारला होता. शोधा म्हणजे सापडेल.) कुठलाही मराठी समीक्षक कुठल्याही लेखकाचे लिखाण फालतू आहे, असं म्हणत नाही. कोणताही प्रकाशक दुसऱ्या प्रकाशकाकडे पाहून छद्मी हसत नाही. मुळात छद्मी हसायचे म्हणजे काय हेच मराठी साहित्य विश्वातले लोक विसरले आहेत. कोणत्याही कवीला कोणताही दुसरा कवी आणि त्याची कविता रद्दी वाटत नाही.

अशा सुस्त वातावरणात वर्षातून किमान एकदा तरी वादाचा धुरळा उठत असे. एकदा तरी उखाळ्या पाखाळ्या काढल्या जात, एकदा तरी कोणीतरी कोणासमोर तरी उभे ठाकत असे. एकदा तरी एखाद्याविषयी तरी कोणी तुच्छतेने बोलत असे…काय त्या श्रीपाद जोशींना आणि साहित्य महामंडळाला अवदसा आठवली आणि त्यांनी साहित्य संमेलनाध्यक्षाची निवडणूक रद्द करून त्या ऐवजी सर्वसमंतीने निवडण्याची सपक योजना आणली. साहित्य संमेलन निवडणूक म्हणजे कसा झणझणीत रस्सा होता. जोशींनी त्याचा पार वरणभात करून टाकला. विदर्भाला सगळे काही झणझणीत  लागते हा समजच त्यांनी खोटा ठरवून टाकला. त्यांचा त्रिवार निषेध. अहाहा काय ते दिवस होते, गेले ते ! साहित्याच्या क्षेत्रात सध्या तर एवढे सगळे गोड गोड वातावरण आहे की मराठी साहित्यालाच मधुमेह होतो की काय, अशी भीती वाटू लागली आहे. ‘लेखक तो दिसे कसा आननी’ याबद्दलची वाचकांची उत्सुकता संपून मराठी साहित्यिकांबाबत उलट त्यांचे ‘आनन’ दिसूच नये असे अनेकांना वाटू लागले.

त्यानंतर संमेलनाध्यक्ष निवडणुकीत गेली काही वर्षे किती मजा सुरु होती. आपण फ.मु. शिंदे यांचा ‘स्पिरिच्युअल’ अनुभव घेतला. त्यांनी तो कवितेतून दिला होताच, परंत निवडून आल्यावर प्रत्यक्ष आपल्या बोलण्यातूनही दिला. त्यानंतर सदानंद मोरेंनी साहित्याच्या राजकीय व्यासपीठावर अध्यक्षाचं नाव कितीही छोट्या अक्षरात आलं तरी गप ‘गुमान’ बसावं असा धडा आपल्याला दिला. श्रीपाल सबनीस तर, ‘साहित्य संमेलन निवडणुकीच्या निमित्तानं सतत १११ दिवस माझं नाव पेप्रात छापून आलं पाहिजे, मी तुला चांदीचा मोदक वाहतो’, असा नवसच बोलले होते म्हणे दगडूशेट गणपतीला. त्यांच्या झपाट्यासमोर वाघ सुध्दा ‘विठ्ठला’ म्हणत विदर्भात जाऊन बसला. सबनीसांचा खरं तर मराठी साहित्य संमेलनाचा प्रसार केल्याबद्दल वेगळा सत्कारही करायला पाहिजे होता. मतदार यादीतल्या कुणाही व्यक्तीला, लहान सहान काही का होईना, पुरस्कार वगैरे मिळाला की ते सपत्निक त्याच्या घरी जात व त्या व्यक्तीचा सपत्निक सत्कार करीत, असं म्हटलं जातं. निवडणुकीची तयारी म्हणून त्यांनी एवढे श्रम घेतल्यावर, त्यांनी वाटलेल्या शाली त्यांना वर्षभरात परत मिळाव्यात एवढ्यासाठी तरी त्यांना अध्यक्ष केलंच पाहिजे, असं वाटून मतदारांनी त्यांना मतं दिली,असं एक मत व्यक्त केलं जातं. त्यानंतर आलेले अक्षयकुमार काळे आपण निवडून कसे आलो या धक्यातून अजूनही सावरेलेले नाहीत, असं नागपुरातील साहित्य वर्तुळात बोललं जातं म्हणतात. आपल्या विजयाबद्दल चिंतन करण्यासाठी, संमेलन झाल्यावर ते जे लगेच अज्ञातवासात गेले, ते थेट गेल्यावर्षी लक्ष्मीकांत देशमुख अध्यक्ष झाले तेव्हा सूत्र देण्यासाठीच प्रकटले. त्यावेळी बातम्या देणारे पत्रकार मात्र एकमेकांना फोन करून देशमुख यांच्या पुस्तकांची यादी मागवत होते. अखेर ती देशमुखांनी स्वतःच दिली तेव्हा लोकांना कळली म्हणतात.

जिंकलेल्या उमेदवारांचं राहु द्यात, हरलेल्या उमेदवारांच्याही अनेक सुरस कथा होत्या. मीना प्रभू यांनी मतदारांना पाठवलेलं पत्र, हमो मराठे यांनी पाठवलेलं आणि गाजलेलं पत्र, ‘आपण कशाला या फंदात पडलो’ या प्रश्नाच्या उत्तराचा शोध अखेरपर्यंत न लागलेले प्रकाशक उमेदवार अरूणराव जाखडे यांच्यासारख्यांमुळे किमान निवडणुकीच्या आधीचे दोन महिने आणि नंतरचा एक महिना तरी साहित्य क्षेत्राच्या बातम्या यायच्या. एरवी ज्यांचा एखाद्या अग्रलेखात साधा उल्लेखही येणार नाही, तो उमेदवार जिंकला की त्यांच्यावर थेट अग्रलेखच लिहून यायचे. पण आता ती सगळी मजाच गेली. सर्वसंमतीच्या अध्यक्षात काही मजाच नाही. बटाट्याची भाजीच जणू, कुणाची आवडती नाही आणि कुणाची नावडतीही नाही.

मराठी साहित्य क्षेत्रात काहीतरी व्हायला हवे, काहीतरी घडायला हवे. सर्व प्रकारांच्या आणि आकारांच्या इंग्रजी पुस्तकांचे घाऊक अभ्यासक आणि विक्रेते शशिकांत सावंत यांनी, अलिकडेच मोठा होऊ घातलेल्या ऋषिकेश गुप्ते या लेखकाच्या काही भयकथा, गुढकथा साता समुद्रापलीकडे जाऊन चाचेगिरी करून ढापून आणलेल्या आहेत असा विचार फेसबुकावर मांडून, त्यातल्या त्यात थोडीफार खळबळ माजवण्याचा प्रयत्न केला. परंतु सावंत यांना गंभीरपणे न घेण्याची अनेकांना सवय असल्याने आणि खरंच अशी तपासणी सुरु झाली तर पाच पन्नास वर्षांपासूनच्या जागतिक साहित्यचोरीविषयक ‘मीटूं’ची मराठीत रांग लागेल अशी भीती वाटून अनेकांनी ही चर्चा फार लांबणार नाही याची काळजी घेतली.

एवढी एक क्षीण खळबळ सोडली तर मराठी साहित्य क्षेत्रात अनुवाद, माहितीपर पुस्तके, अच्युत गोडबोले पंथाची तोंडात पाचही बोटे घालून अचंबित करणारे ज्ञान देणारी संकलने, एवढेच उरले आहे. नेमाडे शांत आहेत, विश्वास पाटील फायलींच्या अभ्यासात लिहिणंच विसरले आहेत. मागे पाटलांचे एक बाड चोरीला गेले होते ते सापडले खरे परंतु प्रकाशात मात्र आलेलेच नाही. अशा संक्रमणाच्या काळात (कोणत्याही काळाला संक्रमणाचा काळ म्हणण्याची पद्धत आहे, त्यानुसार) खुद्द ठणठणपाळ आज असते तर त्यांनीही हातातला हातोडा फेकून देऊन कपाळावर हात मारून घेतला असता. ‘धरावे असे पायच दिसत नाहीत’, असं पुलं म्हणाले होते (म्हणाले होते ना? नसतील म्हणाले तरी पुलं म्हणाले होते म्हटलं की लोक कर्तव्य म्हणून तरी दाद देतातच), तर आता साहित्य क्षेत्रात ‘ओढावे असे पायही’ राहिलेले नाहीत, हेच खरे.

आणि उरलीसुरली मजा सर्वसंमतीच्या अध्यक्षाने घालवून टाकली आहे.

**********

तंबी दुराई

पुनश्चवर आत्ता हा नि:शुल्क लेख आपण वाचलात. कसा वाटला? आवडला का?

ही तर केवळ एक झलक आहे. याहूनही एकापेक्षा एक सरस, आणि विविध विषयांना वाहिलेले लेख आपण पुनश्चवर प्रसिद्ध करतो आणि करतच रहाणार आहोत. तुम्ही सशुल्क सभासद झालात तर हे सर्व लेखही तुम्हाला सहज वाचता येतील. तेही किती स्वस्त! केवळ एक रुपयात एक दर्जेदार लेख!

एक वर्षभराचे फक्त १०० रुपये भरा आणि वाचा १०४ सशुल्क लेख.

मग वाट कशाची पहाताय? ह्या लिंकवर क्लिक करा आणि लगेच सभासद व्हा

Leave a Reply

This Post Has 19 Comments

 1. जयंत दळवी ची आठवण करून देणारा लेख.आपण यवतमाळ जिल्ह्यातील असल्याने विशेष आवडीने आपले लेख वाचतो.अभिनंदन व धन्यवाद

 2. एक नवीन गोष्ट ऐकायला मिळते आहे. तुम्ही ज्यांचा नावाचा उल्लेख पंथ शब्दाआधी केलात त्या दाढीवाल्यांनी आणि त्यांच्या सहलेखिकेने म्हणे त्यांच्या जीनियस नावाच्या नव्या पुस्तकात इतर मराठी पुस्तकांमधला मजकूर जसाच्या तसा छापला आहे! वर कुठेही मूळ लेखकाचा उल्लेख नाही. कुठलेही संदर्भ दिलेले नाहीत. आपणच खूप मेहनत घेऊन हे लिहिले असल्याचा दावा सहलेखिका करते. इतके दिवस इंग्रजीतून मराठीत छापत होते. आता मराठीतून मराठीतच सरळ उचलेगिरी! 🙂

 3. फारच छान!धमाल लेख!

 4. हातोड्याचे काम टाचणीही करू शकते तर !

 5. खुसखुशीत लेख. सर्वांचा परामर्ष छान घेतला आहे. वाचताना मजा आली.

 6. झकास ……… मजा आली.

 7. एकदम मस्त

 8. धक्यातून अजूनही न सावरेलेले काळे आणि आपल्या पुस्तकांची यादी पत्रकारांना देणारे देशमुख.
  संमेलनाध्यक्ष निवडणुकीचा धमाल विनोदी इतिहास. 😀

  1. धक्क्यातून*