गेल्या ४ महिन्यांमध्ये या ना त्या निमित्ताने वेगवेगळ्या देशांमध्ये जाण्याचा योग आला.

जानेवारीत डॉक्टरांच्या ट्रिपच्या निमित्ताने थायलंड झालं. फेब्रुवारीत सिंगापूर मलेशियातील काही व्यक्ती, ज्या आपलं क्लिनिक तिकडे उघडण्यासाठी interested आहेत त्यांना भेटायला गेलो. मार्च महिना लंडनमध्ये आपल्या तिकडच्या क्लिनिकच्या set-up मध्ये गेला. आत्ता एप्रिलमध्ये डॉ. रोहित सान्यांबरोबर जागतिक हृदयरोग परिषदेत पेपर मांडण्यासाठी दुबईला गेलो होतो. तुम्ही म्हणाल, काय मजा आहे या माणसाची! प्रत्येक महिन्यात एक नवा देश.

पण खरं सांगतो,  मानवी मनासारखं चमत्कारिक दुसरं काही नाही. या सगळ्या ठिकाणी जाऊन आल्याच्या आनंदापेक्षा एका ठिकाणी जाऊ न शकल्याची बोच मनाला फार त्रास देते आहे. ते ठिकाण कुठलं, ते चाणाक्ष वाचकांनी ओळखलं असेलच. पण तरीही सांगतो, की एवढ्या ठिकाणी जाऊन आल्याची दखल जराही न घेणारा एकमेव माजोरडा देश या पृथ्वीतलावावर आहे, तो म्हणजे अमेरिका, आणि अमेरिकेच्या Visa Application Centre मधून पार्श्‍वभागावर लाथ मिळण्याची माझी ही दुसरी वेळ. त्यामुळे साहजिकच वेदना अधिक.

मागच्या वेळी, आपले संपादक डॉ. यश वेलणकर आणि मी तिकडच्या महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनाला जाणार होतो. तिकडच्या महाराष्ट्र मंडळाचं आमंत्रण, फिलाडेल्फियाच्या महापौरांचं हमीपत्र, कंपनीची, आमची सगळी वैयक्तिक कागदपत्रे, असा सगळा जामानिमा करून आम्ही धडधडत्या अंत:करणाने त्या मुलाखतीला उभे राहिलो. मुलाखत घेणारा तो गोरा काय बोले, ते आम्हांला उच्चारच कळेनात त्यामुळे त्याने एका दुभाष्याला मध्ये घेतलं. एक दोन जुजबी प्रश्‍न झाल्यावर यॉर्कर आला.

“तुम्ही तिकडे महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनात कशाला चाललाय? ‘’

“तिथल्या महाराष्ट्रियन मंडळींना आमची products दाखवायला, माहिती द्यायला,‘’-आम्ही.

’’पण इथे महाराष्ट्रातच तुम्ही राहता तिथे भरपूर महाराष्ट्रियन मंडळी आहेत, त्यांना आधी माहिती द्या. ’’

असा आगाऊ सल्ला देऊन आम्हांला त्याने वाटेला लावलं.

गेल्या वेळचे सगळे अनुभव लक्षात ठेवून या वेळेला ऍप्लिकेशन करताना फुल सेटींग केलेलं. कोणीतरी म्हणालं की, डॉक्टरांच्या परिषदेचं निमंत्रण असेल तर व्हिसा नक्की मिळतो. तिकडच्या Heart valve सोसायटीने डॉ. रोहित साने यांना त्यांचा पेपर प्रेझेंट करायला तिकडे बोलावलं होतं. त्यांची शेपटी पकडून मी पण त्या संस्थेतून आमंत्रण पत्र मागवलं. मुलाखतीची जय्यत तयारी केली. आता बांद्रा- कुर्ला कॉम्प्लेक्सला त्यांचं नवीन ऑफिस चालू झालंय. वाटलं, या वेळेला नवीन ठिकाण Lucky ठरणार. पुन्हा एकदा सगळी कागदपत्रे गोळा केली. मनाचा मोठा हिय्या करून, जाऊन रांगेत उभा राहिलो. आजूबाजूची मंडळी पण सगळी चिंताक्रांत चेहरे करून उभी होती. कोणी सूट- टाय वगैरे एकदम चकाचक होऊन आले होते. अशांकडे बघून मला उगाचच complex येत होता.

रांग सरकत सरकत main hall मध्ये आली. हातांचे ठसे वगैरे देऊन, मी धडधडत्या अंत:करणाने त्या screen वर आपला नंबर कुठल्या खिडकीवर येतो, याची वाट पाहात उभा राहिलो. या संदर्भातले एकेकाचे किस्से आठवायला लागले. मावशी तिच्या मुलीच्या बाळंतपणासाठी जाणार होती, पण कोकणातून कसं तीनदा तिला इकडे यावं लागलं, तेव्हा कुठे Visa मिळाला ते आठवलं. माझ्या स्टेट बँकेतल्या मित्राची इथून न्यूयॉर्कला बदली होऊनसुद्धा Visa न मिळाल्याने तो इथेच कसा खितपत अडकून पडलाय ते आठवलं. माझ्याबरोबर रांगेत असणार्‍या लोकांकडे पण असे भरपूर किस्से होते. त्यातून US Visa चं एक myth  तयार होत होतं. (ते तसं तयार होणं हे त्यांच्या वाट्टेल तसं Visa Rejection करण्याच्या कृतीतून व्यक्त होत होतं.)

मुलाखतीचा नंबर जसजसा जवळ यायला लागला तसं वॉशरूमला जाऊन यायला हवं होतं की काय अशी लघुशंका पण यायला लागली. बुवा हाकलतात, बायका व्हिसा देतात, मुलाखत घेणार्‍यांबद्दल लोकांच्या अशा अटकळी होत्या. मी मनातल्या मनात कुठल्या खिडकीवर बाई आहे, कुठली मायाळू दिसते असं शोधायला लागलो. शेवटी एकदाचा नंबर display झाला. पुन्हा एकदा एका बाप्याच्याच लाथेचा प्रहार झाला आणि एवढसं तोंड करून पुन्हा या अमेरिकेच्या नादाला लागायचं नाही असा घनघोर पण करून बाहेर पडलो.

तेवढ्यात एजंटचा फोन आला ’’साहेब काय झालं ?’’

’’काय होणार?  हलकटाने लाथ मारली पुन्हा.’’ मी वैतागाने.

’’साहेब, तरी सांगितलं होतं Business Visa नको Tourist Visa ला apply करू या म्हणून. जाऊ द्या या वेळी. पुढच्या वेळी Tourist Visa नक्की मिळेल.’’

आशेवर जग चालतं की नाही माहीत नाही पण अमेरिकेचं Visa Application Centre नक्की चालतं हे मी तिथे रोज येणार्‍या १००० माणसांकडे बघून खात्रीने म्हणू शकतो.

**********

लेखक- किरण भिडे;  अंक-आरोग्यसंस्कार

पुनश्चवर आत्ता हा नि:शुल्क लेख आपण वाचलात. कसा वाटला? आवडला का?

ही तर केवळ एक झलक आहे. याहूनही एकापेक्षा एक सरस, आणि विविध विषयांना वाहिलेले लेख आपण पुनश्चवर प्रसिद्ध करतो आणि करतच रहाणार आहोत. तुम्ही सशुल्क सभासद झालात तर हे सर्व लेखही तुम्हाला सहज वाचता येतील. तेही किती स्वस्त! केवळ एक रुपयात एक दर्जेदार लेख!

एक वर्षभराचे फक्त १०० रुपये भरा आणि वाचा १०४ सशुल्क लेख.

मग वाट कशाची पहाताय? ह्या लिंकवर क्लिक करा आणि लगेच सभासद व्हा

Leave a Reply

This Post Has 10 Comments

 1. अमेरिकेला तुमची भिती वाटली असावी. हा माणूस तिकडे जाऊन अमेरिकन लोकांच्या खिशात आयुर्वेदाची औषध टाकून पैसे काढेल असं त्यांना वाटल असाव! भित्या पोटी ब्रम्हराक्षस असं न म्हणता राक्षसाच्या मनात सतत भिती असंच म्हणायला हव.
  तेंव्हा व्हिसा नाही मिळाला म्हणून हसा !
  माझ्याकडे अमेरिकेचा व्हिसा दहा वर्षे पडून होता. तुमच्या अनुभवावरुन हम भी कुछ कम नही असं म्हणायला हरकत नाही.
  भारतात येउन मधूमेहावर औषध घ्या. स्वस्त पडेल ! असं म्हणून अम्यांची भारतात येण्यासाठी रांग लागेल अशी परिस्थिती तुम्ही आणू शकाल. तो एक प्रकारे व्हिसा नाकारण्याचा सुडच असेल.
  आपणास सुयश चिंतीतो.

 2. अगदी खरंय, लॉटरी आहे,नो लॉजिक,पण इथे मुक्काम ठोकणार नाही हे पुरेसे स्पष्ट व्हायला हवे

  1. लॉटरी हि H१B मध्ये असते. बिझनेस, वर्क आणि टुरिस्ट व्हिसा मध्ये लॉटरी नाही. उपहासात्मक जर लॉटरी म्हणत असाल तर ठीक आहे.
   बिझनेस व्हिसा च्या आधी त्यांचा आपल्याबद्दल नक्कीच काहीतरी अभ्यास झालेलाच असतो. नंतर तुम्ही त्याला पटवून देण्यात यशस्वी झाल्यास अति उत्तम.
   कारण माझ्या अनेक अविवाहित तरुण मित्रांचे बिझनेस व्हिसा मिळालेले आहेत.
   लॉजिक असते, हे नक्की. व्हिसा रिजेक्ट झाल्यावर नैराश्यातून “लॉटरी, नो लॉजिक” इ. शब्द बाहेर पडतात.

 3. इंटरव्हूसाठी हिंदीत साक्षात्कार असा यथार्थ शब्द आहे. इथे ते पटते.
  >>मला असे वाटते कि व्यक्ती अमेरिकन एंबसीत इंटरव्हूला जायच्या आधीच त्यांचे ठरले असते कि “ओके का नॉट ओके”! इतका त्यांचा बॅकग्राउंड चेक असतो. ते मुख्यत्वे काय बघतात?
  >> सगळ्यात महत्वाचे व पहिले म्हणजे ही व्यक्ती अमेरिकेतून परत माघारी जाण्याची ठोस कारणे आहेत का? म्हणजे चालू व्यवसाय अथवा महत्वाची नोकरी आहे, घरी वृद्ध आईवडिलांपैकी कोणी आहे, स्वतःचे राहते घर आहे(fixed assets) रुपयातील लिक्विड कॅशला कसलाही भाव देत नाहीत; कितीही दाखवा!
  >>दुसरे महत्वाचे बघतात ते म्हणजे तुमचे जाण्याचे कारण सबळ आहे का? Tourist Visa असेल तर नातेवाईकांचा महत्वाचा दिवस- पन्नासावा वाढदिवस, मुलीचे gratuation, Thanksgiving, लग्न वगैरे. साईटसीईंग असेल तर त्याचा प्लान. इथे मात्र खर्च कसा करणार ते पाहिले जाते.
  >>बिझनेस व्हिसा साठी एका पत्रावर कधी कोणी जात नाही. त्या आधी बरेच दिवसांचे कम्युनिकेशन असेल तरच त्याला आधारभूत मानता येते.
  तसेच तुम्ही कोणत्या प्रकारचा बिझनेस करता, तो अमेरिकेत प्रमाण मानतात का नाहीअसे बरेच निकष असतात.
  >>सरतेशेवटी तुम्ही अमेरिकेत जाण्यासाठी उताविळे झाला आहात असे त्यांना इंटरव्हूच्या वेळी वाटले तर ठप्प! व्हिसा रिजेक्ट चा शिक्का बसतो.
  >>दुभाष्याची मदत घेतली तरी व न घेतली तरी बिझनेस व्हिसाला त्यांचे इंग्रजी नाही कळले तर अवघडच असते. तुम्हाला त्यांचे इंग्रजीच धड कळत नाही तर बिझनेस मिटींग कशा होणार तुमच्या? भरपूर इंग्रजी सिनेमे ऐकायचे इंग्रजी गाणी ऐकायची कि कळते थोडेफार!
  आणि सगळ्यात शेवटी, हा लास व्हेगास चा जुगार आहे असे समजून जायचे. लागला तर मटका नाहीतर नाही या अॅटिट्यूडने गेलात तर हमखास जॅकपॉट लागतो!!

 4. नमस्कार,
  अमेरिकन व्हिसा चा लेख मस्त होता. मी २०१६ मध्ये बिजनेस व्हिसा ला अर्ज केला होता.
  आधी अनेक मित्रांचे विविध आणि विचित्र अनुभव ऐकले असल्याने मी ठरवले होते कि – “ऐकावे जनाचे, करावे मनाचे”. आणि मग याच BKC मधल्या ऑफिस ला अत्यंत साधारण कपड्यांमध्ये गेलो. सूट, टाय इ. प्रकार मला कधीही आवडले नाहीत.
  व्हिसा च्या रांगेत आमच्या पुढे अभिनेता मिथुन सपत्नीक उभा होता. पुढील लोकांचे घाबरलेले चेहरे आणि सुटा बुटाचे पेहराव बघून खूप हसू येत होते होते. म्हणून आपोआपच माझ्या मनावरील दडपण कमी होत गेले.
  मग आली माझी वेळ- मला हसतमुखाने अधिकाऱ्याने विचारले “काय कामाने तुम्ही तिकडे जाऊ इच्छित आहात?” मी म्हणालो माझ्या कंपनीच्या काही बिजनेस मिटींग्स आणि अनेक नॉलेज शेअरिंग सेशन्स तिथे असणार आहेत. आणि मग वीकएंड ला फिरणार सुद्धा”.
  अधिकाऱ्याने विचारले राहणार कुठे आणि किती दिवस? मी म्हणालो मिशिगन राज्यात डेट्रॉईट शहराजवळच, एक महिन्यासाठी. तिथला पत्ता तोंडपाठ होता, तो सांगितला. आणि मग माझा पासपोर्ट त्यांनी आत ठेऊन घेतला आणि म्हणाल्या ‘वेलकम तो युएस’. साहजिकच (फार नाही) पण आनंद झाला. यानंतर २ वेळा अमेरिका वारी सुद्धा झाली. जमेल तेवढे फिरूनही आलो आणि त्यांच्या इकॉनॉमी ला मदत केली. 🙂

  धन्यवाद
  naik.harshal@gmail.com
  9922407061

 5. माझा असा अनुभव आहे कीं आपल्या एजंटचा सल्ला मानून इंटरव्ह्यू दिला तर काम सोप्पं होते.आमच्या एजंटच्या सल्ल्यानुसार आम्ही मराठीतून इंटर्व्ह्यू दिला आणि आम्हीं कांहीं तुझ्या देशांत मुक्काम ठोक्याला येत नाहीत हे त्या गोट्याला पटवून देऊ शकलो आणि टूरिस्ट व्हिसा मिळाला.

  1. नमस्ते,
   मुळातच टूरिस्ट व्हिसा मिळणे बिलकुल अवघड नाहीये. कारण यात अमेरिकेचा पूर्ण आर्थिक फायदा आहे.
   पण बिजनेस व्हिसा मिळणे खूप अवघड आहे. एका मोठ्या एजन्ट कंपनीच्या अधिकाऱ्याकडून समजले कि ‘युएस बिजनेस व्हिसा चा रिजेक्शन रेट ९०% आहे”. यावरून कल्पना करा कि किती अवघड काम आहे हे.

 6. आमचा अनुभव सुद्धा असाच अनाकलनीय

 7. अगदी खरे .ईतके वाइट आहे तिथली systemएकतर आपल्यालापैसे घेऊन भिकार्यासारखे वागवतात.निट बसायला पण काय ऊभे रहायला सुद्धा जागा नाही.अगदी खरच हलकट आहेत

 8. हा हा हा
  अमेरिकेचा विसा म्हणजे म्हटलं तर गुलबकावलीचं फुल आणि म्हटलं तर झेंडूच फुल.मुळात त्यांच्या कायद्यामध्ये यु एस ला येऊ पाहाणारा प्रत्येक परदेशी माणूस स्थाईक व्हायलाच येतोय असं अध्यारुत धरलेलं आहे,त्यामुळे विसा मागणाऱ्याने तो अमेरिकेत कायम का राहाणार नाही याचे कागदपत्र दाखवावेत असा त्यांचा द्रुष्टीकोन असतो.
  साहजिकच यू एस चा विसा अगदी टूरिस्ट वर्गाचाही मिळणं सर्वस्वी तिथल्या अधिकाऱ्यावरच अवलंबून असतं
  असो