आपली भाषा ही खूपच मजेशीर बाब आहे. आपलीच भाषा श्रेष्ठ अशा समजुतीतून होणारे वाद आणि भांडणं ही नवीन गोष्ट नाही. बाकी काहीही असलं तरी भाषा हा मानवी मेंदूचा एक आविष्कार मानल्या जातो. मेंदूचा अभ्यास करण्यासाठी भाषेचा खूप उपयोग होतो आणि हा अभ्यास खूपच interesting असतो. मध्यंतरी एक मेसेज वाचण्यात आला ज्यात इंग्रजी शब्दांचे स्पेलिंग चुकीचे लिहिण्यात आले होते. तरीपण तो मेसेज आपण बरोबर वाचतो. मानवी मेंदूच्या अफाट क्षमतांपैकी एक ही देखील आहे. पण ही क्षमता आपल्यात आली कुठून? ह्या आणि इतर प्रश्नांची उत्तरं अचानकपणे एका TED talk मध्ये मिळाली. ही व्याख्यानं विविध विषयाची माहिती देतात. प्रत्यक्ष शास्त्रज्ञांकडून ही माहिती ऐकण हा खूपच छान अनुभव असतो. Lera Boroditsky (हे आडनाव जरा अवघडच आहे ‘आपल्या’ भाषेत लिहायला) हीच व्याख्यान ऐकून भाषाविज्ञान किती रोचक आहे हे कळलं. आपण बोलत असलेली भाषा आणि आपल्या मेंदूची काम करण्याची पद्धत या दोन गोष्टींचा थेट संबंध असतो.

Lera ही एक भाषा शास्त्रज्ञा आहे आणि आपली भाषा ही कशाप्रकारे आपली विचारपद्धती ठरवते यावर तीच संशोधन चालतं. जगात एकूण 7000 भाषा बोलल्या जातात. उच्चार, लिपी, लिहिण्याची पद्धत या बाबतीत प्रत्येक भाषा विशिष्ट अशीच आहे. पण ह्या फरकामुळे आपल्या मेंदूच्या विशिष्ट क्षमता विकसित झाल्या आहेत. नेमकी हीच गोष्ट लेरा तिच्या व्याख्यानात सांगते. ऑस्ट्रेलियात असलेली एक आदिवासी जमात, कुकटायर (मला आवडलं हे नाव) खूपच प्रगत आहे असं जर मी म्हणालो तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. काही पक्षी आणि सरपटणारे प्राणी यांना दिशेचं ज्ञान निसर्गतः असतं. याच कारण चुंबकीय लहरी त्यांना जाणवू शकतात आणि ते त्यांना प्रतिसाद देखील देऊ शकतात. आपल्यामध्ये ही क्षमता नाही. पण कुकटायर लोकं आपल्यापेक्षा वेगळे आहेत. त्यांच्या भाषेमुळे त्यांच्यात ही क्षमता विकसित झाली आहे. यांच्या भाषेत वर, खाली, मागे, पुढे या संकल्पनाच नाहीत. या आणि इतर संकल्पना या दिशेने सांगितल्या जातात. उदाहरण द्यायचं झालं तर असं म्हणता येईल की समजा एखादया कुकटायर माणसाने असं सांगितलं की त्याच्या शरीराचा ईशान्य भाग दुखतो आहे तर याचा अर्थ असा होतो की डावा खांदा दुखतो आहे (एकंदरीत कठीण प्रकरण आहे). हे लोक अशाच भाषेत बोलतात. त्यामुळे या लोकांचं दिशा ज्ञान अफाट आहे. वाऱ्याची दिशा, सूर्याची दिशा यांना खूप चांगल्या प्रकारे समजतात (आपली बोंब आहे याबाबतीत) इतकंच काय काळ देखील यांच्या भाषेत एक खूप वेगळीच संकल्पना आहे. वाढणार वय म्हणजे काळ आपल्यापासून दूर जातो आहे असं ते मानतात. याचा अर्थ असा आहे की केवळ भाषेमुळं मानवामध्ये ही अफाट क्षमता विकसित झाली आहे.

दुसरं उदाहरण रंगाचं. रशियन भाषेत रंगांच्या विविध छटांना एक नाव असतं. त्यामुळे रंगांच्या बाबतीत रशियन माणसाचा मेंदू जास्त संवेदनशील असतो. मराठीमध्ये निळया रंगाला फक्त आकाशी आणि निळा अशी नाव आहेत. त्यामुळे निळ्या रंगाच्या सगळ्या गडद छटा ह्या गडद निळा म्हणूनच ओळखल्या जातात. त्यामुळे आपला मेंदू या छटांमधील सूक्ष्म फरक ओळखू शकत नाही पण रशियन मेंदू अगदी सहज हे काम करतो.

याच धर्तीवर एखादं नाम हे एका भाषेत स्त्रीलिंगी तर दुसऱ्या भाषेत पुल्लिंगी असतं. उदाहरणार्थ पूल. मराठीत पूल हे पुल्लिंगी तर स्पॅनिश भाषेत स्त्रीलिंगी आहे. त्यामुळे लंडनच्या पुलाच वर्णन मराठी माणूस भव्य, मजबूत, दणकट असं करेल तर स्पॅनिश माणसासाठी ‘ती’ पूल सुंदर, नक्षीदार ‘अशी’ असेल. म्हणजे विशेषणं ही वेगळी असतील. या फरकामुळे एकाच गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. जसं की भाषिक फरकामुळे जर्मन आणि ब्रिटिश लोक पूर्णतः भिन्न आहेत. एखादी घटना घडल्यानंतर ब्रिटिश कर्त्याचा विचार जास्त करेल तर जर्मन माणूस ती घटना कशी घडली याचा विचार प्रामुख्याने करेल. आता तुमच्या लक्षात येईल की शेरलॉक होम्सच्या कथांमध्ये रहस्य हे व्यक्तिकेंद्रीत का असतं. चायनीज आणि जपानिज भाषा ही चित्रलिपी आहे त्यामुळे या लोकांचे मेंदू इतर लोकांपेक्षा भिन्न आहेत. जपानी लोकांचा काटेकोरपणा, नेमकेपणा हा लिपिसारखाच असतो.

भारतात तर अनेक भाषा बोलल्या जातात. प्रत्येक भाषेचा ढंग, बाज निराळा. त्यामुळे क्षमता देखील. कदाचित एखाद्या क्षेत्रात एका विशिष्ट भाषिक लोकांचं प्रमाण जास्त का असतं याच उत्तर यात दडलं असेल. संशोधन क्षेत्रात बंगाली लोकांचं प्रमाण इतकं जास्त का किंवा उद्योग व्यवसायात गुजराती समाज आघाडीवर याच मूळ कुठेतरी भाषेत असू शकतं. अभ्यासाला खूप वाव आहे. पण दुर्दैवानं आपल्याकडे या अनुषंगानं पहिल्या जात नाही.

भाषेचा अभ्यास यापुढे जाऊन आपल्याला खूप वेगवेगळ्या प्रकारे मदत करू शकतो. आपल्याला हे माहिती आहे की मूकबधिर लोकांची एक विशिष्ट भाषा असते. ही भाषा त्यांचं आयुष्य जगण्यासाठी सोपं करते. अशीच किमया ब्रेल लिपीने अंधांसाठी केली. परंतु स्वमग्न किंवा मतिमंद मुलांच्या मेंदू क्षमता भिन्न असू शकतात. त्यांना आपल्या भाषेत शिक्षण देऊन आपण कदाचित त्यांच्या अडचणी वाढवत आहोत. त्यामुळे एखादी नवीन भाषा किंवा आपल्या भाषेत काही बदल केले तर त्यांचं आयुष्य नक्कीच बदलु शकेल. ज्यांना आपण स्वमग्न किंवा मतिमंद म्हणतो त्यांचा मेंदू आपल्यापेक्षा खूप वेगळ्या क्षमतांचा असू शकतो अशी शक्यता पडताळून बघितली जात आहे याकामी भाषा नक्कीच उपयोगाची आहे. ज्या लोकांना 3 पेक्षा जास्त भाषा बोलता येतात अशा लोकांमध्ये अल्झायमर होण्याचं प्रमाण अगदी नगण्य आहे हे सिद्ध झालेलं आहे. नवनवीन भाषा शिकणं हा मेंदू तल्लख ठेवण्याचा उपाय आहे असं शास्त्रज्ञ मानतात.

मला स्वतःला असं वाटतं की परग्रहावरील जीवन शोधण्यासाठी 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पृथ्वीवर झालेली सजीवांची उत्क्रांती आणि झालेला भाषेचा विकास. हे जर आपण पुर्णपणे समजू शकलो तर दुसऱ्या एखाद्या ग्रहावर जीवन शोधणं आणि त्यांच्याशी संपर्क साधणं हे शक्य होईल. कारण भाषेचा अभ्यास हा थेट मेंदूच्या प्रगतीचा आरसा आहे आणि परग्रहावरील सजीव हे कुठल्या टप्प्यात आहेत हे भाषेवरून समजू शकेल.

व्याख्यानाच्या शेवटच्या टप्प्यात लेरा खूप महत्त्वाचा मुद्दा मांडते. सध्या भाषा विषयक अभ्यास हा मुख्यत्वे अमेरिकेत होतो. यातून इतर मुख्य भाषा या वगळलेल्या असतात. कुकटायर जमातीसारख्या अनेक जमातीच्या भाषा इतकंच काय मृत समजल्या जाणाऱ्या ग्रीक, लॅटिन आणि संस्कृत भाषांचा वैज्ञानिक अभ्यास होणं गरजेचं आहे. यातून आपल्या मेंदूची माहिती नक्कीच समोर येईल. आज साधारणतः एक भाषा प्रत्येक आठवड्याला नष्ट होते. याच वेगाने सध्या बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी अर्ध्या भाषा येत्या 100 वर्षात नष्ट होतील. नष्ट होणारी प्रत्येक भाषा ही खूप वेगवेगळ्या पातळीवर नुकसान करते. हे पाहता भाषा किती महत्वाची आहे हे लक्षात येईल. त्यामुळे आपल्या बुद्धीमत्तेचं गुपित आपल्याजवळच आहे तेदेखील आपल्या जिभेवर तेवढं सांभाळलं म्हणजे झालं!

**********

लेखक- अमोल कुलकर्णी 

ब्लॉग लिंक- https://bit.ly/2Siisne

 

Leave a Reply

This Post Has 10 Comments

 1. खूपच माहिती मिळाली आहे हा लेख वाचूून

 2. नमस्कार. माझा हा लेख पुनश्च टीमला आवडला आणि आपण वाचकांना सुद्धा. छान वाटलं. सर्वांचे आभार. हा विषय खरंच खूप महत्त्वाचा आहे. इतर देशांमध्ये भाषा ही अस्मितेइतकीच वैज्ञानिकदृष्ट्या देखील महत्वाची आहे. आपण मात्र भाषिक वैशिष्ट्ये पूर्णपणे दुर्लक्षित ठेवली आहेत. आपल्या कमेंट्स मधून काही छान मुद्दे समोर आले. लेख लिहिण्याचा एक उद्देश तर यशस्वी झाला. पुनश्च आणि आपणा सर्वांमुळे हे शक्य झाले. माझे इतरही लेख आपण माझ्या ब्लॉगवर जरूर वाचा. अशीच छान चर्चा, सूचना यांच स्वागतच आहे.
  अमोल कुलकर्णी,
  koolamol.wordpress.com

 3. खूप छान माहितीपूर्ण लेख . अत्यंत ओघवत्या शैलीत लेखकाने भाषा विज्ञानाची ओळख करुन दिली आहे. लेख खूप आवडला.याविषयी अजून जाणून घेण्याची उत्सुकता आहे. लेखकाचे आणि पुनश्च चे अभीनंदन.

 4. माहितीपूर्ण लेख.मन:पूर्वक आभार

 5. खूपच माहितीपूर्ण लेख. हा लेख वाचून मराठी भाषा वा इतर प्रादेशिक भाषा कशा अधिकाधिक समृद्ध होतील किंवा प्रसार पावतील याची जबाबदारी पुढील पिढीकडे कशी सुपूर्त होइल ह्यावरच तिचे अस्तित्व राहील. त्यासाठी आपल्या भाषेत बोलणे आणि वाचणे अत्यंत गरजेचे आहे. आठवड्यात एक भाषा नष्ट होते हे वाचून दुःख झाले. पुन्हा एकदा खूप छान लेख.

 6. लेख वाचताना वि वा शिरवाडकरांचा पुनश्र्चमधेच वाचलेला ‘पाळमुळ’ लेख आठवला. भाषा म्हणजे केवळ शब्दांचे बुडबुडे नसतात. प्रत्येक शब्द आपली संस्कृती घेऊन आपल्या मनात एका चित्ररूपाने उभा राहतो. आपला सर्वांगीण परिसर, ज्यात माणसांसहित सर्वकाही समाविष्ट असते, तो आपल्या मनावर परिणाम करतो. त्यातून आपल्या जाणिवा चोखाळून आपण अर्थ काढतो. सकारात्मक भाषा आपल्या जाणिवा समृद्ध करतात. ‘नाही’ या शब्दाचा खरोखर अर्थ काय आहे? काय सांगू इच्छितो तो शब्द? पण ‘आहे, असणे’ हे शब्द बरेच काही सांगून जातात!
  रशियन भाषेच्या उदाहरणा प्रमाणेच संस्कृतातही एकाच गोष्टीच्या, वस्तूच्या निरनिराळ्या छटा दाखवणारे शब्द आहेतच की.
  मराठीचा बोलु कवतुके म्हणताना आपली शब्दसंपत्ती किती आहेे हे मी शोधायचा प्रयत्न केल्यास ‘कवतुक’ करण्या एवढी ती नक्कीच नाही हे जाणवले की माझी मलाच लाज वाटते.
  नकारात्मक विचार व्यक्त करायला मझ्याकड

 7. सुंदर , विचारांना चालना देणारा लेख

 8. फारच माहितीपूर्ण लेख.

 9. वा!! एकदम कुतूहल जागवणारा विषय आहे!! भाषेचा विचारांवर आणि क्षमतांवर होणारा परिणाम !! एक वेगळा आणि महत्वाचा विचार TED TALK वरुन मराठीत आणल्याबद्दल अमोल कुलकर्णींचं आणि तो लेख पुनश्च वर आणल्याबद्दल पुनश्च टीम चं अभिनंदन.
  ह्या विषयावर खरंच अजून संशोधन व्हायला हवं.

 10. खूप छान माहिती. भाषा विकास हा पाया आहेच, पण तो शिखरही ठरू शकतो तर..