नमस्कार. डिसेंबर महिन्याचे संपादकीय लिहिताना ‘अब्द अब्द मनी आले’ अशी अवस्था झाली आहे. तरीही  जे जे म्हणायचे आहे ते प्रयत्नपूर्वक थोडक्यात मांडतो. हा हा म्हणता ( या वाक्प्रचाराचा उगम एकदा शोधला पाहिजे. ) डिसेंबर महिना आला आणि २०१८ लिहायची सवय होता होता वर्ष संपत सुद्धा आले. या वर्ष संपण्याचा पुनश्च शी एक संदर्भ आहे. मागच्या वर्षी सप्टेंबर च्या ३० तारखेला आपण पुनश्च सुरु केले आणि  डिसेंबर पर्यंत पैसे भरणाऱ्या सभासदांना आपण ३१ डिसेंबर २०१८ पर्यंतचे सभासदत्व दिले. असे साधारण ३०० हून जास्त सभासद असतील. त्यांचे सभासदत्व या महिन्याच्या अखेरीस संपेल. २०१८ संपण्याचा पुनश्च शी संदर्भ आहे तो हा. यातील अनेकांनी सभासदत्वाची मुदत संपली का? नुतनीकरण कसे करायचे? अशा विचारणा केल्या. समाजातला चांगुलपणा दिसतो तो अशा वेळी. या सगळ्या ३०० सभासदांना आता पर्याय आहे. पुनश्च चे सभासदत्व पुन्हा घ्यायचे की नाही…

म्हणून याचवेळी मला काही सांगायचे आहे. whatsapp वर आता ‘वर्षभरात माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर मला त्याबद्दल माफ करा’ असे सांगणारे मेसेजेस फिरायला लागतील. त्याच धरतीवर मलादेखील काही कन्फेशन्स ( मराठी शब्द ?) करायची आहेत.

माझ्याकडून ( अपश्रेय घ्यायचे असल्याने ते एकट्याने घेतोय ) दोन अनुभव तुम्हा वाचकांना वाईट मिळाले. पहिला अनुभव पुनश्च वर तंबी आणि डॉ यश यांचे सशुल्क ब्लॉग्स सुरु केले त्यावेळी आला. खरंतर यामागचा उद्देश खूप चांगला होता पण त्याची अंमलबजावणी नीट झाली नाही. परिणामी खूप वाचकांचे गैरसमज झाले. खूप जणांनी रागावून वाचन सोडून दिले. वस्तुस्थिती अशी होती की पुनश्च च्या वाचकांना आठवड्याचे २ सशुल्क लेख मिळत होतेच. पण त्याशिवाय येणारे तंबी चे आठवड्याला एक आणि डॉ यश यांचे पंधरवड्याला एक हे लेख त्या ब्लॉग्स चे अधिकचे शुल्क भरल्याशिवाय वाचता येत नव्हते. खरंतर त्याचे प्रत्येकी फक्त ५० रुपये  या लेखकांना द्यायचे होते. पण कुठेतरी हे समजावण्यात आम्ही कमी पडलो आणि वाचकांचे गैरसमज वाढत गेले. शेवटी या दोन्ही लेखकांनी मन मोठे करून जून महिन्यापासून त्यांचे लेख विनामुल्य उपलब्ध करून दिल्यामुळे पुढचे वाद टळले. याबद्दल या दोन्ही लेखकांचा मी खरंच खूप आभारी आहे.

मी दिलेला दुसरा अनुभव मात्र अजूनही बऱ्याच जणांना येत आहे तो म्हणजे सतत login करावे लागण्याचा. यासाठी काही वेळा वाचकांचे अज्ञान कारणीभूत होत असेल पण बरेचदा अडचण तांत्रिक असायचीच. त्या कटकटीला कंटाळून कित्येकांनी सशुल्क लेख वाचणे सोडून दिले. अवांतर सदरातील लेख निःशुल्क असल्यामुळे ते वाचू शकत आणि कित्येकांना तर हा फरकच समजला नाही. त्यामुळे ते वाचक वाचता येतंय या आनंदात होते. यासंबंधी मी अनेकदा whatsapp वर निरोप टाकले पण ते आता असो…

वर्षभर या दोन गोष्टींनी मला छळलं. मग मी आपला डेव्हलपर विनय सामंत ला छळलं. आणि या छळवादाची परिणीती म्हणून बहुविध.कॉम ची निर्मिती झाली. एक असे तंत्रव्यासपीठ ज्यावर पुनश्च चे लेख वाचता येतीलच पण त्यासहित अन्य विषयांची नियतकालिकेही वाचता येतील. वर सांगितलेल्या दोन अडचणींचे निराकरण हाच यामागचा मुख्य उद्देश होता. नुसतेच मी कन्फेशन करून उपयोग काय? त्यावर मार्ग तर शोधला पाहिजे. बहुधा तो मार्ग आता आपल्याला मिळालाय.

पहिली अडचण होती पुनश्च सहित इतर कॅटेगरी स्वतंत्रपणे चालवता येण्याची. पुनश्च ही कॅटेगरी जुन्या अंकातील कालसुसंगत लेखांना तुमच्यापर्यंत पोचवते. पण वाचकांना रस वाटेल असे इतर अनेक विषय आहेत. अनेक चांगल्या विषयावरील साहित्य त्या त्या कॅटेगरीचे संपादक तुम्हाला उपलब्ध करून देऊ शकतील. पण पुनश्च वर ते तांत्रिकदृष्ट्या साध्य होत नव्हतं. पूर्वी तंबी किंवा डॉ यश किंवा दोन्ही, घ्यायचे असेल तर पुनश्च घेणे ही पूर्वअट होती. मात्र आता एखाद्या हॉटेलात जाऊन आपण जसे मनाला वाटतील तसे ( अ ला कार्ट ) पदार्थ मागवतो तसेच बहुविध.कॉम वर येऊन आपल्याला आवडतील त्या विषयाच्या नियतकालिकांना तुम्ही shopping cart मधून विकत घेऊ शकता. एकाच वेळी ही खरेदी केली पाहिजे असेही नाही, एखाद-दोन कॅटेगरी सध्या घेतल्या आणि मग वर्षभरात कधीही आणखी एखादी कॅटेगरी विकत घ्यावीशी वाटली तरीही तुम्ही ती घेऊ शकता. सर्व कॅटेगरी चे सभासदत्व बहुतकरून ३६५ दिवसांचे असेल. पुनश्च आवडणारे फक्त पुनश्च चे पैसे भरून त्याचेच लेख वाचू शकतील. इतर कॅटेगरीवरील लेख त्यांना दिसणार नाहीत. तीच गोष्ट इतर कॅटेगरीबद्दल. यातून बहुधा मागच्या वर्षी झालेले गैरसमज टळू शकतील.

दुसरी अडचण होती सतत login करावे लागण्याची. बहुविध.कॉम वर सभासद सोशल login करू शकतील. म्हणजे आपण फेसबुक किंवा gmail वर जी सुविधा अनुभवतो तीच दरवेळी विना login करता app/website उघडण्याची सुविधा आता यापुढे बहुविध.कॉम वर अनुभवता येणार आहे. एकदा फक्त तुमचे अकाऊंट तुमच्या सोशल login शी जोडून ठेवायचे. की झाले काम. वर्षभर पुन्हा login करायला नको.

अशा बऱ्याच गंमतीजमती बहुविध.कॉम या नव्या तंत्रव्यासपीठावर केल्या आहेत. याबद्दल अधिक माहिती आम्ही दे राहूच. अर्थात पुनश्च ही देखील एक मराठी साहित्यात प्रथमच घडलेली घडलेली गंमत होती. तुम्ही सर्वांनी त्यात नुसतं तोंडाने नाही तर खिशात हात घालून सहकार्य केलंत. त्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे. तुम्हाला जो काही नंतर त्रास, मनस्ताप झाला त्याबद्दल मी खरंच दिलगीर आहे. आता यापुढच्या प्रवासात पुनश्च बरोबर राहायचे की नाही हा निर्णय सर्वस्वी तुमचा आहे. मी अजिबात अशी ग्वाही देणार नाही की यापुढे काहीच तांत्रिक अडचणी येणार नाहीत. त्या नक्की येणार. पण आमचा हेतू जर तुम्ही ध्यानात घेतलात तर या सगळ्या अडचणींवर आपण नक्की मत करू आणि मराठी साहित्यविश्वात एक नवा मापदंड घडवू. हा लेख वाचलात आणि नुतनीकरण करण्याची तयारी असेल तर whatsapp वर किंवा इथेच नक्की संपर्क साधा.

बाकी या डिसेंबर महिन्यात आपल्याकडे भरपूर गोष्टी घडणार आहेत. पुनश्च वर उत्तमोत्तम लेख असणार आहेतच. शिवाय आजपासून दीर्घा नावाची एक कॅटेगरी आपणच सुरु करतोय. आधी मी याबद्दल माहिती दिली होती. अधिक माहिती www.bahuvidh.com/dirgha या लिंकवर मिळेल. या कॅटेगरीचे सभासदत्व तिथेच विकत घेता येईल. लवकरच पुस्तक परिचयाची एक निःशुल्क कॅटेगरी प्रसिद्ध उद्योजक प्रदीप लोखंडे सुरु करणार आहेत. त्यांना श्रीकांत बोजेवार आणि भानू काळे मदत करणार आहेत. गावखेड्यातील शाळा शिक्षक आणि त्यांचे विद्यार्थी या कॅटेगरीचा लाभ उठवू शकतील. खऱ्या अर्थाने सकस साहित्य ‘तळागाळात’ पोचेल. शिवाय तंबी आणि डॉ यश यांचे ब्लॉग्स जरी या महिन्याच्या शेवटी बंद होणार असले तरीही जानेवारीपासून श्रीकांत बोजेवार आपल्या सहकाऱ्यांसह चित्रपट विषयक कॅटेगरीतून आपल्याला भेटतीलच. डॉ यश सुद्धा हिंदी भाषेत काही सुरु करायच्या प्रयत्नात आहेत. अवांतर ही निःशुल्क कॅटेगरी वेगळी चालवली जाईल आणि यावर्षीपासून आपल्या वाचकांनी लिहिलेले लेख संपादक मंडळाकडून निवडून, संपादित करून आठवड्याला एकेक प्रसिद्ध करू. अशा अनेक कॅटेगरी आता बहुविध.कॉम वर सुरु होऊ शकतात. जसजश्या नवनवीन कॅटेगरी आत येतील, आम्ही कळवत राहूच.

सरतेशेवटी एक विनंती, आम्हाला कल्पना आहे की खूप बदल आणि तेही खूप कमी कालावधीत, म्हणजे आधीचा बदल पचायच्या आधीच आपण पुढचा बदल आणतो आहोत. पण वाचकांना उत्तम वाचानानुभव देण्यासाठी आम्हाला हे बदल अत्यावश्यक वाटले, आणि म्हणूनच केले. मुळात पुनश्च हाच मराठी साहित्य प्रकाशनविश्वात एक बदल होता, तो तुम्ही मोठ्या मनाने स्वीकारलात. पुनश्च ते बहुविध हाही बदल तुम्ही स्वीकारावा असं आम्ही तुम्हाला आर्जव करतो.

गेल्या वर्षभरात तंत्र सहाय्यक विनय सामंत, संपादकीय सहाय्यक सुधन्वा कुलकर्णी आणि आमचे सल्लागार श्रीकांत बोजेवार सर ही आता ‘टीम पुनश्च’ म्हणून निश्चित झाली आहे. आता येत्या वर्षभरात अजून कोणकोण आपल्या परिवारात सामील होतंय याची उत्सुकता आहे.

Leave a Reply

This Post Has 10 Comments

 1. पुनश्च ऍप बंद करून बहुविध सुरू करणार का?

 2. खुप चांगला ऊपक्रम आहे.Improvisation is the root of new innovation /development,तर बदल स्वीकार करावा लागेल .आणि तुम्ही लीहुन दिलगिरी दाखवलीत त्या बद्दल खरच तुमचे आभारच मानायला हावेत.

 3. आपल सबस्क्रिप्शन संपल आहे हे आम्हाला आगोदर कळेल का?

 4. चूका होणे स्वाभाविक आहे. हार्दिक शुभेच्छा!

 5. वर्षभरात चांगले लेख वाचायला मिळाले
  त्याबद्दल धन्यवाद
  सभासदत्व कायम करायसाठी काय करावे लागेल ते सांगा

 6. आता लिहल ते रजिस्टर का झाल नाही हे कळेल का? नवीन वर्षात पुनश्चची प्रगती होवो ही अपेक्षा ते login वारंवार करायला लागू नये बाकी लेख ऊत्तम असतातच

 7. लेख चान्गला आहे प्रत्येक वेळी login करायची भानगड अजूनही दिसते ती पुर्णपणे बंद करावी तंबी आणि याचे लेखनासाठी वेगळे शुल्क नको हे बरे झाले सर्वच लेख ऊत्तम आहेत काही अडचण आली की सुधन्वा लगेच मदत करतो पुनश्च नवीन वर्षात अजून चान्गले लेख देतील ही अपेक्षा पुनश्चला शुभेच्छा

 8. Nice sir

 9. Teething troubles सर्वच व्यवहारात असतात त्याबद्दल दिलगिरी प्रदर्शित करण्याची आवश्यकता नव्हती पण तरीसुद्धा तुम्ही हा मोठेपणा दाखवलात त्यासाठी तुम्ही अभिनंदनास पात्र आहात . नवीन उपक्रम सुलभतेने सुरु होऊन इच्छुकांपर्यंत पोहोचावा म्हणून तुम्हाला सर्वांना शुभेच्छा .

 10. वाः छान कल्पना. पण सभासद होण्याचे शुल्क किती व online कसे भरावयाचे हेपण येथेच कळवायचे. आपण घेत असलेल्या परिश्रमाबद्दल आपले धन्यवाद!