‘जय महाराष्ट्र…’

‘जय महाराष्ट्र!’

‘अरे थांब थांब, ‘जय महाराष्ट्र’ ला उत्तर देण्याची घाई करू नकोस. आता आपल्याला जय महाराष्ट्र नंतर ‘जय श्रीराम’ सुध्दा म्हणायचं आहे.’

‘हे कधी ठरलं?’

‘कधी ते महत्वाचं नाही. ठरलं हे महत्त्वाचं. आदेश आहे.’

‘कोण? बांदेकर? ते तर हल्ली सिद्धिविनायक मंदिरात बसतात ना?’

‘हे बघ, एक तर मी तुला आदेश आहे म्हणजे, साहेबांचा आदेश आहे, असं सांगितलं होतं…’

‘आदेश साहेबांचा आहे हे वेगळं सांगायची गरज नाही,आदेशची आणि साहेबांची जवळीक माहिती आहे मला.’

‘आता काय बोलू मी? तुझी गाडी सतत भलतीकडेच वळते आहे. हे बघ, जय महाराष्ट्र नंतर जय श्रीराम सुध्दा म्हणायचं अशी ऑर्डर आहे. आता कळलं?’

‘कळलं, कळलं.’

‘आणि काय रे, आदेश म्हटल्यावर तू आधी बांदेकरांचं नाव घेतलंस ते ठिक आहे, पण ते सिद्धिविनायक मंदिरात ‘बसतात’ म्हणजे काय ? असतात म्हण की!’

‘बरं, असतात तर असतात. पण असतात तेव्हा ते बसतात हे खरं की नाही?’

‘हल्ली तू फार किस पाडतोस शब्दांचा.’

‘शब्दांचा किस हाच तर आता आपला मुख्य अजेंडा आहे ना?  असं करू आणि तसं करू, असं आपलं म्हणत रहायचं. म्हणायला कुणाचं काय जातं? लोकांना हल्ली काही लक्षात ठेवायची सवय नाही आणि लक्षात ठेवायला सवडही नाही, ते बरं आहे. लोकांना मालिका पहायच्या असतात, फेसबुकवर अंगठे टाकायचे असतात, व्हाट्सअप ग्रूप्सवर आलेले मेसेज पहायचे असतात, सेल्फी काढायचे असतात. केवढी कामं आहेत लोकांना. पण असो. पुन्हा एकदा पूर्ण अभिवादन करतो. जय महाराष्ट्र…जय श्रीराम सुद्धा…

‘सुद्धा नाही म्हणायचं. फक्त जय श्रीराम. परत बोल…’

‘जय महाराष्ट्र…जय श्रीराम’

‘शाब्बास… बोल आता पुढे.’

‘म्हटलं,एकूण आपलं मस्तच झालं, नाही का?’

‘अरे, कशाचं काय मस्त झालं? तुझ्या वाक्याला काही शेंडा बुडखा?’

‘तेच रे. अयोध्या वगैरे.  म्हणजे, आपण मस्त गेलो, मस्त घोषणा बिषणा दिल्या.  एकूण मजा आली’

‘मजा? मजा करायला गेलो होतो की काय आपण?’

‘तू नाही केलीस मजा? आम्ही केली बुवा. किती दिवस इथं मुंबईत आणि महाराष्ट्रात घोषणा देत बसायचं आपण? ते नारायण राणेसुद्धा दिल्लीत पोचले. आपण आपले इथंच.’

‘राणे दिल्लीत पोचले? की त्यांना दिल्लीत पोचवले?’

‘पोचवले तर पोचवले. पण तेवढाच चेंज तर मिळाला ना त्यांना. तसंच मलाही वाटलं बुवा. आम्ही तर मस्त सेल्फ्या काढल्या. राम मंदिरासमोर, तिथल्या साधू-संत-महंतांसोबत, शरयुच्या तीरावर’

‘विट…’

‘वीट ?? किती अरसिक रे तू? सेल्फी काढायचाही तुला वीट येतो? कमाल आहे.. मी तर दिसेल त्या साधूसोबत,साध्वीसोबत सेल्फी काढून घेतल्या.’

‘तू आता नीट ऐकून घेशील का? विट म्हणजे, मी म्हणालो, साहेबांनी चांदीची विट भेट दिली तिथे.’

‘ते होय? पण ती खरंच विटेच्या आकाराची होती की विटेचा केवळ आकार होता?’

‘फारच गोंधळात टाकतोस तू? काय प्रश्न आहे तुझा नेमका?’

‘म्हणजे, असं बघ साहेबांनी भेट दिलेली विट आकाराने खऱ्या विटेच्या आकाराएवढी होती की तिचा आकार फक्त खऱ्या विटेसारखा होता.’

‘बापरे! मला वाटतं आपलं आधीचं, फक्त जय महाराष्ट्रच बरं होतं की काय. हे जय श्रीराम काही झेपणार नाही आपल्या पोरांना. तुझ्यावरूनच कळतंय, किती गोंधळला आहेस ते. विट काय, विटेसारखी विट काय, आकार काय…काय प्रकार आहे हा? किती गोंधळ?’

‘आमचा कसला गोधळ? आम्ही आग आहोत. आम्ही वाघाचे बछडे आहोत. आम्ही अंगार आहोत. आम्ही पेटून उठतो. आमच्याशी खेळाल तर जळून जाल..’

‘बास बास…हे मला नको सांगूस. हे बाहेर सांगायचं असतं.’

‘बरं, पण एकूण मजा आली, हे मान्य आहे की नाही तुला? मस्त मजेत गेलो. मस्त मजेत आलो. नाही तर नेहमी आपलं भेटा, पार्कात जमा आणि घरी जा. भाषणात अंगार आणि भाषण संपलं की अंधार.’

‘फार बोलतो आहेस तू हां…हे असं अयोध्या वगैरे काही नेहमी नेहमी होणार नाही. नेहमी आपलं पार्कातच.’

‘पण एक गोष्ट सांगतो. आपण अखेर खेचून घेतला हां अयोध्येचा मुद्दा भाजपकडून आपल्याकडे! ती इमारत पाडली तेव्हाही ती कोणी पाडली ते माहिती नाही, पण ‘माझ्या सैनिकांचा अभिमान वाटतो’ असं म्हणून आपण न पाडताच सगळं आपल्याकडे खेचून घेतलं आणि आता कोणीही मंदिर बांधलं तरी साहेब म्हणतीलच, माझ्या सैनिकांनी तिथपर्यंत धडक मारली म्हणूनच बांधून झालं मंदिर. त्यांनी एवढे दगड आणले पण त्यांना आपली एक विट भारी पडेल. याला म्हणतात सौ लोहार की आणि एक सुनारकी…चांदी की विट.’

‘तुझ्या बोलण्यातही फारच विट आहे, पण हे इंग्रजीतलं व्हीट तुला नाही कळणार. दे सोडून.’

‘दिलं सोडून! जय महाराष्ट्र, जय  श्रीराम सुद्धा’

‘अरे? हे काय परत?’

‘सॉरी सॉरी… जय महाराष्ट्र, जय  श्रीराम! पण एकूण मजा आली हे मात्र मी पुन्हा सांगतो तुला.’

तंबी दुराई

पुनश्चवर आत्ता हा नि:शुल्क लेख आपण वाचलात. कसा वाटला? आवडला का?

ही तर केवळ एक झलक आहे. याहूनही एकापेक्षा एक सरस, आणि विविध विषयांना वाहिलेले लेख आपण पुनश्चवर प्रसिद्ध करतो आणि करतच रहाणार आहोत. तुम्ही सशुल्क सभासद झालात तर हे सर्व लेखही तुम्हाला सहज वाचता येतील. तेही किती स्वस्त! केवळ एक रुपयात एक दर्जेदार लेख!

एक वर्षभराचे फक्त १०० रुपये भरा आणि वाचा १०४ सशुल्क लेख.

मग वाट कशाची पहाताय? ह्या लिंकवर क्लिक करा आणि लगेच सभासद व्हा

Leave a Reply

This Post Has 6 Comments

  1. क्या बात है।

  2. झकास

  3. मस्तच…. आवडला

  4. मस्त जमलाय

  5. छान च.

  6. क…डॅक…!