बारावीत असेन तेव्हा. कॉलेजात असताना अनेक महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी वगैरे चे औचित्य साधून आम्ही कार्यक्रम करायचो. त्या वर्षीचा सहा डिसेंबर. बाबासाहेबांचा महानिर्वाण दिन साजरा करायचं ठरलं. निमंत्रित वक्त्यांचं व्याख्यान आणि त्यानंतर प्रश्नोत्तरे असं नेहमीचं स्वरूप. तीन चार दिवस आधी प्रसिद्धी सुरु केली. फर्ग्युसनच्या मेन बिल्डिंगसमोर तीन चार फलक असलेली एक जागा आहे. त्यावर कार्यक्रमाची माहिती वगैरे लिहिली की कार्यक्रमाला गर्दी जमवायला विशेष कष्ट घ्यावे लागत नसत. महानिर्वाण दिनाच्या दोन दिवस आधी मी रंगीत खडू घेऊन पाटीवर कार्यक्रमाची सूचना लिहीत होतो. तंद्री लागलेली. तेवढ्यात मागून एका सिनियर दिसणाऱ्या मुलाने हटकले.

“ए इकडं ये.” तो.
मी गेलो. “काय दादा?”
“ते काय लिहीलंय?” तो.
“कार्यक्रमाची सूचना.” मी.
“अरे पण ते काय लिहीलंय कळतं का तुला?” तो.
त्याचा आवाज पाहून मी जरा हबकलो.
“सूचना आहे दादा परवाच्या कार्यक्रमाची.”मी.
“काय लिहीलंय ते नीट वाच. जाणूनबुजून लिहिलं असेल तर सोडणार नाय” तो.

मी वाचू लागलो. कार्यक्रमाच्या सूचनेत ‘महापरिनिर्वाण दिन’ च्या ऐवजी अनावधानाने ‘पुण्यतिथी’ असं लिहिलेलं. त्याने वाचायला सांगितल्यानंतर माझ्या लक्षात आलं. सामाजिक वगैरे विषय आणि या संबोधनातले बारकावे तेव्हा कुठे कळायला? मी त्याच्याशी अर्ग्यु करू लागलो. पुण्यतिथी लिहिलं तर काय बिघडतं इ इ. तो म्हणाला कार्यक्रम होऊ देणार नाही. वाद वाढत गेला. शेवटी आमच्यातल्या एकाने मध्यस्थी केली. त्याला समजावले आणि मला ‘पुण्यतिथी’ हा शब्द खोडून ‘महापरिनिर्वाण’ असं मोठ्या अक्षरात लिहायला लावलं. त्यानंतर कार्यक्रम व्यवस्थित पार पडला.

फर्ग्युसनला असताना अशा अनेक घटना घडल्यात. त्यात अगदी ठळकपणे लक्षात राहिलेली ही एक..

कट टू महापरिनिर्वाण दिन २०१७

काल एका मित्राने विचारलं, “काय मग उद्या महापरिनिर्वाण दिनाचा कुठं कार्यक्रम?” मी “कुठेच नाही.” म्हणून गप्प बसलो. विचारचक्र सुरु झालं. कॉलेजात असताना पाच वर्षांपूर्वी घडलेली ती घटना डोळ्यासमोरून अगदी आत्ता घडल्यासारखी तरळून गेली. ती आठवण अजून तितकीच जिवंत होती. माझी नजर शून्यात लागल्याचं पाहून मित्राने आवाज दिला. मी भानावर आलो..

आज महापरिनिर्वाण दिन साजरा करावा इतका उत्साह नसण्याचं कारण काय?

बाबासाहेब आंबेडकर!!
होय. त्या घटनेनंतर जसजसा अभ्यास सुरू केला तसतसा बाबासाहेबांचा जीवनपट उलगडत गेला. अगदी त्यांच्या बालपणापासून, कॉलेज जीवनापासून ते चवदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या वेळी संधी असूनही शस्त्र न उचलण्याची समाजबांधवांना विनंती करणाऱ्या संयत आणि समन्वयी भूमिकेपर्यंत. स्त्रीवादापासून दलितोद्धारापर्यंत आणि जातिनिर्मूलनापासून राष्ट्रवादापर्यंत चौफेर व्यापून टाकत भारताचे सांस्कृतिक आणि सामाजिक जीवन कमालीचे समृद्ध-श्रीमंत करणारे मार्गदर्शक आंबेडकर!

त्यांच्या विद्वत्तेबद्दल लिहिण्याचा लोभ आवरता आवरत नाही. पण महत्वाचं म्हणजे, पुढे अभ्यास करताना आणि अनेक ठिकाणी भूमिका मांडताना बाबासाहेबानी तेव्हा मांडलेली मते आजही किती सुसंगत आहेत याची प्रचिती पदोपदी येत गेली. प्रत्येक भूमिकेत त्यांच्या साहित्याचा संदर्भ दिल्याने चर्चा मार्गस्थ होत गेल्या. आणि बाबासाहेब रोजच्या जगण्याचा भाग बनून गेले. रोज कुठल्यातरी गोष्टीसाठी समग्र आंबेडकर मधले संदर्भ आता अनिवार्य झालेत.

आम्ही आंबेडकर रोज जगतो!

पण म्हणून जयंती आणि महानिर्वाण दिन वाजतगाजत साजरा करणारा वर्ग कमी परिपक्व आहे असे कदापि नाही. अन्यायात वर्षानुवर्षे पिचलेल्या जनतेने पेटून उठावं आणि अन्यायाच्या विरोधात संघर्ष करावा. विश्लेषकाने त्याचं संयत आणि त्रयस्थ विश्लेषण करावं. पण परिपक्व आणि अस्मिताशून्य राहण्याची चैन अन्यायग्रस्त जनतेला परवडत नाही. कारण तो लक्ष लक्ष विद्रोहाचा आवाज आहे. अर्थात जनता आज खरेच अन्यायात आहे की नाही हा वेगळा चर्चेचा मुद्दा. पण म्हणून पाच वर्षांपूर्वीच्या त्या प्रसंगात ज्या मुलाने प्रखर आक्षेप नोंदवला त्याच्या भावनेचा आणि अस्मितेचा आजही अनादर वाटत नाही.

आता बाबासाहेब हे बाबासाहेब आहेत म्हणून त्यांची मते चिकित्सा न करता जशीच्या तशी स्वीकारायची नसतात ही समजही त्यांच्याच अभ्यासातून आली आहे. आंबेडकरांचा प्रवास अस्मितावादातून अन्यायाला वाचा फोडून अन्यायाचे परिमार्जन करणे आणि अस्मिताशून्य परिपक्वतेकडे वाटचाल करणारा आहे. तिथं भावनिकता व्यवहारावर हावी होत नाही. अस्मिता परिस्थितीवर हावी होत नाही.

त्यामुळे फक्त जयंती आणि महानिर्वाण दिन साजरा करण्याचा काळ आता संपला. बाबासाहेब प्रत्येकाला जगावे लागतील.

आम्ही बाबासाहेब आंबेडकर रोज जगतो!

लेखक- प्रतिक कोकसे; माध्यम- फेसबुक 

Leave a Reply

This Post Has One Comment

  1. फार चांगला लेख. अतिशय संयत.