गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या माणसांच्या मरणाची साथच आल्यासारखी वाटते. श्रीनिवास खळे, गौतम राजाध्यक्ष, जगजित सिंग, स्टीव्ह जॉब्ज् सारखी दिग्गज प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्त्व एकामागून एक काळाच्या पडद्याआड चालली आहेत. यांतील प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रात अक्षरश: बाप होता. प्रत्येक जण गेल्याची प्रत्येक प्रमुख वृत्तपत्राने पहिल्या पानावर बातमी दिली, पण एका माणसाची यात विशेष नोंद घ्यावी लागेल कारण तो माणूस भारतीय नव्हता तरीही भारतातल्या प्रत्येक भाषेतल्या वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर तो गेल्याची बातमी होती. तो माणूस म्हणजे ऍपल कंपनीचा प्रवर्तक स्टीव्ह जॉब्ज्. अवघ्या ५७ वर्षांच्या आयुष्यात त्याने केलेली अचाट कामगिरी पाहिली की तो कुठल्या एवढ्या विलक्षण घाईत होता असा प्रश्‍न पडतो. आपल्यापैकी बहुतेक जणांना ’ऍपल’ माहिती असेल पण त्याचं कुठलंही प्रोडक्ट आपण क्वचितच वापरत असू. ’मायक्रोसॉफ्ट’ आपल्या सारख्या असंख्य सामान्य माणसांच्या संगणकीय जीवनाचा मोठ्ठा हिस्सा व्यापून असतानादेखील अभिजनांचा खास ओढा कायम ’ऍपल’ कडेच राहिला. आणि ऍपलने देखील त्याचं हे A class apart  असणं अभिमानाने मिरवलं. मीसुद्धा कायम विस्मयाने ऍपल कंपनीच्या कम्प्युटर, आयपॉड, आयफोनकडे पाहत असे; वाटे यांची एवढी महाग प्रोडक्टस् कोण घेतात? पण लंडनला जेव्हा हाय स्ट्रीटवर वर ’ o2 ’ च्या दुकानाबाहेर एवढी प्रचंड लाइन कसली लागली आहे म्हणून चौकशी करायला गेलो, तेव्हा ती आयफोनसाठीची होती हे कळलं आणि ऍपलचे फोन कोण घेतं याचा उलगडा झाला. चीनमध्ये सुद्धा गेलो तेव्हा बहुतेकांच्या हातात आयपॉड नाहीतर आयफोन.

आपल्याला इथे नोकिया हीच मोठी कंपनी वाटते पण बाहेर जी क्रेझ आहे ती आयफोनचीच. स्टीव्ह गेला, त्याच्या २ – ३ दिवस आधीच त्याच्या नव्या फोनचं लॉंचींग झालं होतं आणि त्याची प्रतीक्षायादी कित्येक लाखांची होती. हे सगळं पाहता जगाला आज काय हवंय याचा त्याला किती जबरदस्त अंदाज आला होता ते कळतं. स्टीव्हचं सगळंच अद्भुत होतं. त्याचं कॉलेजला न जाणं, तरीही वयाच्या पंचविशीतच स्वत:ची Computer बनवणारी कंपनी चालू करणं, वाद होऊन त्यातनं बाहेर पडणं. मग ’टॉय स्टोरी’ सारखा ऍनिमेशनपट बनवून डिस्ने कंपनीतला सगळ्यात मोठा समभागधारक होणं, पुन्हा ऍपलमध्ये येणं आणि मरण समोर दिसू लागल्यावर तितक्याच विरक्तपणे दुसर्‍या माणसाकडे पदभार सोपवून अनंताच्या प्रवासासाठी तयार होणं. स्टीव्ह ज्या दिवशी गेला त्या दिवशी बिल गेट्सपासून, हल्लीच्या फेसबुकच्या झकरबर्गपर्यंत सगळ्यांच्या प्रतिक्रिया वृत्तपत्रांत छापून आल्या. वाचताना वाटलं स्टीव्ह किती नशीबवान. ’चंगो’ ची एक चारोळी अशी आहे – पुसणार कोणी असेल तर डोळे भरून यायला अर्थ आहे. कुणाचे डोळे भरणार नसतील तर मरणसुद्धा व्यर्थ आहे. जगात रोज लाखो  मरणं व्यर्थ होत असताना स्टीव्हच्या मरणाच्या नशिबात मात्र शेकडो देशांतल्या करोडो लोकांचे अश्रू होते. त्याच्याबरोबर काम करायला मिळालेली लोकं किती नशीबवान. आज आपण कुणी त्याला भेटायचं म्हटलं तरीदेखील काही उपयोग नाही, कारण तो तर पुढे निघून गेला. मग? आता काय करायचं? आता आपण सगळ्यांनी आपल्यातच स्टीव्ह शोधायचा. कुठेतरी तो आपल्याला सापडेलच. कदाचित रोज आपण ’अभ्यासाला बस’ असं सांगूनदेखील खेळातच रमणार्‍या आपल्या मुलांत तो सापडेल, कदाचित आपल्याकडून मान मोडून काम करून घेणार्‍या आपल्या बॉसमध्ये तो दिसेल किंवा कदाचित ’समाज काय म्हणेल’ या भीतीपोटी आपल्या स्वत:तच तो खोल कुठेतरी लपून बसलेला असेल. त्याला शोधायलाच हवं. हा शोध चालू ठेवणं हीच ‘स्टीव्ह जॉब्ज्’ ला खरी श्रद्धांजली ठरेल.

image credit: snopes.com

Leave a Reply