नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

नमस्कार, वाचकहो. हा हा म्हणता ३१ डिसेंबर झाला आणि १ तारीख उजाडली.  २०१७ साल संपलं आणि पुनश्च सुद्धा ३ महिन्याचं झालं. मराठी भाषेसाठी, साहित्यासाठी आणि पर्यायाने मराठी समाजासाठी काहीतरी करायचं बरेच दिवस मनात होतं. 'पुनश्च'च्या रूपाने ते यावर्षी साकार झाल्याचं समाधान आहे. या काळात आपण सशुल्कचे ३० आणि अवांतरचे ८१ असे मिळून १११ लेख प्रसारित केले. मला आशा आहे की सगळे जरी नाही तरी त्यातले बरेचसे तुम्ही वाचले असणार.. या तीन महिन्यात  मराठी साहित्याचे प्रकाशक, लेखक, श्याम जोशीसरांसारखे ग्रंथालय क्षेत्रातले दिग्गज अशा खूप साऱ्यांशी परिचय झाला. तुमच्यासारख्या हजारो सुजाण, चोखंदळ वाचकांच्या संपर्कात आलो. २०१७ साल या अर्थाने मला खूपच समृद्ध करून गेले.

पाळंमुळं

'मराठी पाल्याचे मातृभाषेतून शिक्षण' हा माझा सध्या अतिशय आवडीने बोलण्याचा, चिंतनाचा आणि निरीक्षणाचा विषय. कितीतरी वर्षांपूर्वी कालनिर्णय मध्ये आलेला कुसुमाग्रजांचा हा लेख. त्यानंतरही कितीजण याविषयावर पोटतिडीकीने लिहिले, बोलले असणार पण पालकांवर त्याचा किती परिणाम झालाय हा संशोधनाचा विषय. आणि काही वर्षांनी पुन्हा हा लेख छापायची आपल्यावर वेळ न येवो अशी प्रार्थना करूया...

कवितेची कथा

आजच्या या कविता रसास्वाद सदरातल्या तीनही कविता चुकवू नयेत अशाच. जे कवितेचे प्रेमी असतील त्यांना तर या कविता पुन्हा प्रेमात पाडतीलच पण या प्रेमाशी अनभिज्ञ असणाऱ्यांनी तर या नक्कीच वाचा. पण हा... इतके दिवस आपण या सुखाला का बरं पारखे राहिलो म्हणून विषाद वाटून घेऊ नका. कारण शेवटी 'जहाँ से जागे, वहीसे सबेरा' हेच खरं.