आजवर आम्हाला भरपूर वाचकांनी त्यांना वाचायला अजून काय आवडेल ते कळवलं. कोणी फोनवरून कळवले, तर कोणी मेसेज करून. कोणी whatsapp वर तर कोणी एखाद्या लेखाखाली कमेंट मध्ये.पण त्याची नोंद एकाच ठिकाणी न झाल्यामुळे अडचण येत आहे. वाचकांची आणि पर्यायाने आमचीही सोय व्हावी म्हणून वाचकांना हे आवाहन.

तुम्हाला एखाद्या लेखकाचा एखादा विशिष्ट लेख किंवा कविता वाचायची असेल तर या पेजवर तशी मागणी कळवा. करायचे काय तर एकदम सोपे. तुमचे username टाकून कोणता लेख तुम्हाला वाचायला आवडेल ते लिहा. लेखक, लेखाचे शीर्षक आणि नियतकालिकाचे नाव/वर्ष ही सगळी माहिती दिलीत तर शोध सोपा होईल…

Leave a Reply

This Post Has One Comment

 1. १. सर्वप्रथम मी स्वा. सावरकरांचं नाव घेईन. त्यांच्या “विज्ञान आणि समाज” पुस्तकात एकापेक्षा एक उत्कृष्ट लेख/निबंध आहेत. बहुतेक सर्वांना त्यांचा गायीवरचा लेख/निबंध “ऐकून” माहीत असतो (“वाचून” नव्हे). तो तर ह्यात आहेच पण इतरही अनेक मिळतील. आपल्याकडे सणासुदीच्या काळात अनेक निरर्थक प्रथा पाळल्या जातात. सावरकरांनी अशा अनेकांचा समाचार घेतलेला आहे. “पुनश्च” मधून असे लेख यायला हवेत.

  २. सावरकर पचायला जड जातील असं वाटत असल्यास श्रीपाद कृष्ण कोल्हटकर ह्यांचं “सुदाम्याचे पोहे” विचारात घ्यावे. सदर पुस्तकात अत्यंत विनोदी भाषेत समाजातल्या अनेक भोंगळ समजुतींची केलेली थट्टा आढळून येईल. ह्यातच “चोरांचे संमेलन” हा जबरदस्त लेख आहे. साहित्य किंवा नाट्य संंमेलनाच्या आसपास तो टाकता येईल.

  ३. कोल्हटकरांना गडकऱ्यांनी गुरुस्थानी मानलं होतं. गडकऱ्यांच्या संपूर्ण बाळकराम मध्ये “छोट्या जगूचा रिपोर्ट” नावाचा अवघ्या दोन ते तीन पानांचा अफलातून लेख आहे.

  ४. विनोदाचा विषय निघालाच आहे तर तो जरा पुढे नेऊ. आचार्य अत्रे ह्यांचे विनोदगाथा नावाचे पुस्तक आहे. ह्यात कोल्हटकर, गडकरी, चि. वि. जोशी, पु. ल. देशपांडे अशा अनेक विनोदी लेखकांचा आणि त्यांच्या लेखनाचा सविस्तर ऊहापोह केलेला आहे. ह्यातच पाश्चात्य लेखक आणि लिंकन सारख्या थोर राजकारण्यांचे प्रसंगावधानाचे अनेक हास्यस्फोटक किस्से आहेत.

  ५. आता थोडं करुण रसाकडे वळू या. “समाधीवरील अश्रू” ह्या अत्र्यांच्याच पुस्तकात अनेक महनीय नेत्यांवरील मृत्युलेख सापडतील. त्या त्या व्यक्तीच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने ते ते लेख टाकता येतील.

  ६. कविवर्य कुसुमाग्रज ह्यांनी जरी आत्मचरित्र लिहिलं नाही तरी आपल्या जीवनातले काही किस्से त्यांनी “वाटेवरच्या सावल्या” (मूळ नाव: विरामचिन्हे) ह्या पुस्तकात वर्णिले आहेत. साधारण वीस लेख ह्या पुस्तकात वाचायला मिळतील. एखाददोन लेखांचा अपवाद वगळला, तर बाकी सर्व लेख तुुफानी विनोदी आहेत. “गाभारा” किंवा “अखेर कमाई” वगैरे कवितांतून त्यांचं उपहासात्मक काव्य लोकांना परिचित आहेच. वाटेवरच्या सावल्या मधून त्यांचा गद्य लेखनाचा एक वेगळाच पैलू वाचकांसमोर येऊ शकतो.

  ७. सुंदर काव्याचं तितक्याच सुंदर भाषेत केलेलं परीक्षण जर वाचनात आलं तर? ग. त्र्यं. माडखोलकर ह्या थोर लेखकाने अनेक उत्तमोत्तम काव्यसंग्रहांचा अतिशय गोड भाषेत रसास्वाद घेतलेला आहे. (पुस्तकाचं नाव विस्मरणात गेलंय… पण आठवून सांगेन)

  ८. कुसुमाग्रजांप्रमाणेच ग. दि. माडगूळकर ह्यांनी आपल्या काही आठवणी “मंतरलेले दिवस” ह्या पुस्तकात लिहिलेल्या आहेत. ह्यातला प्रत्येक लेख अगदी समरसून लिहिला गेलाय. वाचकांना नक्कीच मोहात टाकेल.

  ९. रा. चिं. ढेरे ह्या विद्वान व्यक्तीचं अलिकडेच निधन झालं. “लज्जागौरी”, “आनंदनायकी” पासून खंडोबा, दत्त संप्रदाय किंवा श्रीविठ्ठल अशा अनेक विषयांवर त्यांच्याकडून अतिशय अभ्यासपूर्ण असे लेख लिहिले गेले आहेत व त्यांची पुस्तके निघाली आहेत. ह्यात कुठेही भोंगळ भक्तिवाद नाही. ईश्वराच्या विविध मूर्तींचा, मानवाच्या चालीरीतींचा, देवाला दिल्या गेलेल्या विविध नावांचा त्यांनी शास्त्रीय दृष्ट्या मागोवा घेतलेला आहे. वाचकाच्या ज्ञानात अनमोल भर टाकणारी अशी ही पुस्तके आहेत.

  १०. गेली दहा ते पंधरा वर्षे श्री. अरुण फडके हे मराठी भाषेवर सातत्याने व्याख्याने देत आले आहेत, कार्यशाळा भरवत आले आहेत. काही वर्षांपूर्वी तरुण भारत मधून त्यांची अभ्यासपूर्ण (आणि तरीही ज्ञानजड नसलेली) लेखमाला चालू होती. त्यांनाही विचारता येईल.