राहून गेलेल्या गोष्टी

३० डिसेंबर ला प्रसारित करायला यापेक्षा वेगळा विषय काय आणि याहून चांगला लेखक कोण असणार? हा लेख वाचून तुम्हीदेखील आजवर 'राहून गेलेल्या गोष्टी' ची यादी बनवा आणि येणाऱ्या नव्या वर्षात त्या पुऱ्या करायचा संकल्प करा. हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना संकल्प सिद्धीचे, आरोग्याचे आणि भरपूर वाचनानंदाचे जावो हीच सदिच्छा.

श्रद्धा आणि अंधश्रद्धा

दत्तप्रसाद दाभोळकर सरांचा मी फॅनच आहे म्हणा ना. 'रंग माझा वेगळा' वाचल्यावर अजून काय होणार? तुम्हीही ते मिळवून वाचाच. त्यांचं बरचसं लिखाण त्यात आहे. कालनिर्णय मधला 'श्रद्धा आणि अंधश्रद्धा' हा त्यांचा लेख म्हणजे त्यांच्या जीवनमुल्याचे प्रतिबिंबच समजा. ना फार उजवीकडे, ना फार डावीकडे असा मस्त तोल सांभाळत ते लिहितात. गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर तर मला या लेखाचा संदर्भ अधिक स्पष्ट होऊ लागला. त्यांचे बंधू कै. नरेंद्र दाभोलकर अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करायचे. पण श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यातील सीमारेषा एकदम धूसर आहे. कुठली श्रद्धा डोळस आणि कुठली अंध हे कोण ठरवणार? श्रद्धा आणि अंधश्रद्धा या जोपर्यंत घराच्या उंबरठ्याच्या आत आहेत तोपर्यंत इतर कोणाला त्यात काही आक्षेप असू शकत नाही. पण त्या जेव्हा उंबरठा ओलांडतात तेव्हा प्रश्न सुरु होतात. आणि त्याचा जेव्हा बाजार मांडला जातो तेव्हा ते प्रश्न गंभीर होतात.

असा धरी छंद…

स्वमदत या सदराखालील हा लेख. हल्ली सगळीकडेच स्वमदत उर्फ self help पुस्तकांचा बोलबाला आहे. त्यामुळे पुनश्च मध्ये देखील उपयोजित लिखाण हवं असं मला वाटलं . नाडकर्णीसरांचा हा छंदाविषयीचा लेख मला त्यासाठी एकदम योग्य वाटला. डॉ आनंद नाडकर्णी हे चतुरस्त्र व्यक्तिमत्व आहे. मानसोपचारतज्ज्ञ तर ते आहेतच पण त्याचबरोबर लेखक, नाटककार, प्रभावी संवादक याही भूमिका ते उत्तमप्रकारे निभावतात. छंदाविषयी लिहिलेला हा त्यांचा लेख आपल्याला अंतर्मुख करतो. या लेखाच्या निमित्ताने प्रत्येकाने स्वतःच्या आत डोकावून पहात आपापला छंद ओळखावा आणि त्यावर लगेच अंमलबजावणी सुरु करावी.

पाळंमुळं

'मराठी पाल्याचे मातृभाषेतून शिक्षण' हा माझा सध्या अतिशय आवडीने बोलण्याचा, चिंतनाचा आणि निरीक्षणाचा विषय. कितीतरी वर्षांपूर्वी कालनिर्णय मध्ये आलेला कुसुमाग्रजांचा हा लेख. त्यानंतरही कितीजण याविषयावर पोटतिडीकीने लिहिले, बोलले असणार पण पालकांवर त्याचा किती परिणाम झालाय हा संशोधनाचा विषय. आणि काही वर्षांनी पुन्हा हा लेख छापायची आपल्यावर वेळ न येवो अशी प्रार्थना करूया...