लेखक

तंबी दुराई



संक्षिप्त परिचय राजकीय, साहित्यिक, सांस्कृतिक आणि सामाजिक व्यवहारांकडे भिंगातून पाहात अरभाट आणि चिल्लरांचे माप त्यांच्या त्यांच्या पदरात टाकण्याचे (नसते) उपद्व्याप गेली १८ वर्षे अविरत करत आलेला निरूद्योगी म्हणजेच तंबी दुराई

सविस्तर परिचय आपल्याला आपल्या भोवताली घडत असलेले जेवढे दिसते त्याच्या किमान शंभरपट तरी आपल्या नजरेआड घडत असते. माणसे दिसतात तशी अजिबात नसतात आणि आहोत तसे आपण दिसू नये यासाठी सतत धडपडत असतात. अशी स्वतःला फुल समजणारी अनेक हाफ माणसे समाजात सर्वच क्षेत्रात असतात. डॉ. अरूण टिकेकर यांनी अशांचा समाचार घेण्यासाठी सदराचे शस्त्र पुरवले आणि ते शस्त्र निट चालते रहावे यासाठी समाजातील या विविध लोकांनी आपल्या आचरणातून सतत दारूगोळा पुरवला. तंबी दुराईने तो नेमका उचलून घेण्याचं व्रत कसोशीनं पाळलं आहे. दोन फुल आणि एक हाफ घेतल्याशिवाय रविवारची झिंग चढत नाही अशी अनेकांची स्थिती त्या काळात झाली होती,त्याला सर्वस्वी तंबी दुराई जबाबदार आहेत. रविवारचे दोन पेग टिकेकरांच्या प्रोत्साहनाने सांस्कृतिक व्यवहारातील दांभिकतेच्या दर्शनाने काठोकाठ भरलेले असंत आणि त्या शेवटच्या अर्ध्या पेगची कीक त्याहून मोठी असे. कुमार केतकरांच्या सहवासाने त्यात राजकीय शरसंधानाची भर पडली आणि बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, आर आर पाटील, विलासराव देशमुख. राज ठाकरे या सर्वांनाच या अडीच पेगचे व्यसन जडले. खरे तर तंबीने बाळासाहेबांनाही अनेकदा डिवचले होते तरीही, 'मी जे चित्रांमधून करतो तेच तू शब्दांमधून करतोस', अशी दाद खुद्द बाळासाहेबांनी मातोश्रीवर बोलावून दिली. (एरवी अनेकांना मातोश्रीवर ते केवळ समज देण्यासाठीच बोलावत). राज ठाकरेही त्यांच्यावर तंबीने केलेली टीका खिलाडू वृत्तीने घेतात. शरद पवार वाचतात आवर्जून परंतु आपण वाचले आहे असे कधीही चुकूनही दाखवत नाहीत. काही साहित्यिक जराशा मस्करीने चिडून उठल्याचेही तंबीने अनुभवले आहे. या सर्वच व्यवहारांमधली मोठी माणसे कमी होऊन हळू हळू खुजी,दीड दमडीची माणसे संख्येने वाढू लागली तेव्हा तंबीने “दीड दमडी”ची शस्त्रे परजली. २०१७ मध्ये प्रधान सेवकांच्या मर्जीने एवढे काही घडत होते की तंबीने थांबून थोडी वाट पहायचे ठरवले. पण आता तो त्याच्या नवीन अवतरासह पुनश्र्च आला आहे.


पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts