हंस

अनंत अंतरकरांनी १९४६ मध्ये 'हंस' हे अभिजात साहित्याला वाहिलेलं मासिक सुरू केलं. त्यांचे चिरंजीव आनंद अंतरकर यांनी १९६६ मध्ये संपादनाचा वसा घेतला. त्याचंही व्यक्तिमत्त्व वडलांइतकंच बहुमुखी होतं.
मराठी वाङ्मयाच्या विकासाला दोन्ही अंतरकरांच्या अभिजात आणि उदारमनस्क संपादकीय दूरदृष्टीनं नेमकी दिशा दिली. कोणत्याही पठडीची, संप्रदायाची किंवा 'स्कूल'ची बंधनं न मानता स्वच्छंद आविष्कार साधता येणारं एक मुक्त व्यासपीठ त्यांनी लेखकांना निर्माण करून दिलं. अनंतरावांनी आणि आनंदरावांनी लेखकाला स्वतःच्या स्वभावधर्मानुसार फुलण्यासाठी अनुकूलता निर्माण केली.
पन्नासच्या दशकातील भावे, मोकाशी, जी. ए., गोखले, दलाल, फडणीस इ. सिद्धहस्त लेखक-चित्रकारांपासून; मधल्या पिढीतल्या सासणे, मतकरी, प्र. ल. मयेकर, अनिल रानडे, आशा बगे, प्रतिभा रानडे, अनिल रघुनाथ कुलकर्णी, यशवंत रांजणकर, रंगनाथ पाठारे, वसंत मिरासदार, रा. रं. बोराडे, शिरीष कणेकर, प्रभावळकर, पद्मा सहस्रबुद्धे, सुभाष अवचट, श्याम जोशी, सत्यवान टण्णू आणि अगदी अलीकडच्या मेघना पेठे, अनिरुद्ध बनहट्टी, पंकज कुरुलकर, संतोष वरधावे, सतीश भावसार यांच्यापर्यंत - अशा तीन-चार पिढ्यांचा साहित्यिक आणि कलात्मक आविष्कार जोपासला.
पुनश्च चे सभासदत्व* घ्या.