नागनाथ संतराम इनामदार, (जन्म:२३ नोव्हेंबर १९२३, मृत्यू १६ ऑक्टोबर २००२) हे ऐतिहासिक कादंबरी लेखनासाठी प्रसिद्ध आणि लोकप्रिय असलेले नाव. त्यांच्या झेप, झुंज, मंत्रावेगळा, राऊ, शहेनशहा, शिकस्त, राजेश्री, या कादंब-यांनी अमाप लोकप्रियता मिळवली. ते 'भूमीतरंग' या नियतकालिकाचे संपादक होते. त्याच्या लेखनाची सुरूवात कथा लेखनाने झाली. १९४५ मध्ये 'अनिल' या साप्ताहिकातून इनामदारांनी आपले लेखनसुरू केले. 'हंस', 'मोहिनी', 'किर्लोस्कर', 'साप्ताहिक स्वराज्य' वगैरे नियतकालिकांतून त्लेयांनी कथा लेख लिहिले.
मराठेशाही आणि पेशवे यांचा कालखंड हा त्यांच्या कांदबरी लेखनासाठीचा आवडता काळ. त्रिंबकजी डेंगळे या ऐतिहासिक व्यक्तिरेखेवर त्यानी लिहीलेल्या 'झेप' या कादंबरीच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. १९६६ साली आलेल्या त्यांच्या 'झुंज' या कादंबरीनेही लोकप्रियता मिळवली. दुस-या बाजीरावाच्या आयुष्यावर बेतलेली 'मंत्रावेगळा' , औरंगजेबाच्या जीवनावरील 'शहेनशहा', पार्वतीबाईसाहेब पेशवे यांच्या जीवनावरील 'शिकस्त', थोरल्या बाजीरावांवरील 'राऊ' मधे या कादंबऱ्यांनी त्यांचे नाव मराठी साहित्याच्या इतिहासात कायमचे राहील.





