म्हटल्याप्रमाणं संध्याकाळी तो माझ्या ऑफिसांत आला. आम्ही मग जवळच्याच हॉटेलांत गेलों. रंगानं भली मोठी ऑर्डर दिली, कॅप्स्टनचं एक पाकीट मागवलं नि माझ्या खांद्यावर हात ठेवून तो म्हणाला, "बाप्या, कसं काय ? हाउ ईज लाइफ ?"
"ठीक आहे. आमचं आयुष्य ठरविक चाकोरीतलं. त्यांत विशेष असं काय घडणार ? तुझं कसं काय ?"
"फाइन. काळजी नाहीं, कथा नाहीं !"
तेवढ्यांत खाद्यपदार्थ आले, सिगरेटचं पाकीट आलं. रंगानं दोन सिगरेटी काढून त्यांची टोकं टेबलावर आपटली नि मला त्यांतली एक सिगरेट दिली.
त्याला खुलविण्यासाठीं मी म्हटलं, "रंगा, लेका गेल्या जन्मीं तूं खूप पुण्य केलेलं दिसतंय. इथं ह्या जगावर स्वर्गात असल्यासारखा वागतो आहेत तूं. आय् रिअली एन्व्ही यू !"
“खरं आहे. मी स्वर्गातल्यासारखाच इथं वावरतो आहे. स्वर्गातली मदिरा इथं आहे नि अप्सराहि आहेत. खरं कीं नाहीं ?"
"कुणास ठाऊक बाबा ?”
"हात् लेका ! कुणास ठाऊक काय, मला ठाऊक आहे. गेल्या आठवड्याचीच गोष्ट–"
"म्हणजे ही गोष्ट सांगण्यासाठीं तूं मला भेटणार होतास का ?"
"छट् ! आतां आठवण झाली एवढंच. तूं भेटावंस म्हणून तुला दुपारीं थाप मारली गंमत सांगायची आहे म्हणून. हरकत नाहीं. हाहि किस्सा मोठा ढंगदार आहे."
"असं ? मग सांग ना."
"सांगतों.” त्यानं पहिल्या सिगरेटच्या तुकड्यानं दुसरी सिगरेट पेटवली नि गोष्ट सांगायला सुरुवात केली....
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .